पुणे- नाना पेठेत गँग वारची धक्कादायक घटना घडली आहे. वनराज आंदेकर टोळीतील मुख्य आरोपी गणेश कोमकर याच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. गोविंद कोमकर या 19 वर्षीय मुलावर आंदेकर टोळीने तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गोविंद कोमकर या तरुणाचा मृत्यू झाला आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. कुठे आहेत ‘ पुण्याचे नवे शिल्पकार’? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
या संदर्भात एका पोस्टच्या माध्यमातून रोहित पवार यांनी पुण्यात पोलिसांच्या नाकावर टीच्चून रक्तरंजित होळी खेळली जात असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर प्रचंड दहशतीखाली असलेला सामान्य माणूस जीव मुठीत धरून बसला असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले की, ‘लाखो भक्तांच्या उपस्थितीत जगातील सर्वांत मोठा गणेशोत्सव पुण्यात साजरा होत असताना टोळीयुद्धाचा भडका उडतो… एक टोळी दुसऱ्यावर धडधडीतपणे गोळ्या चालवते आणि पोलिसांच्या नाकावर टीच्चून पुण्यात रक्तरंजित होळी खेळली जाते.. प्रचंड दहशतीखाली असलेला सामान्य माणूस जीव मुठीत धरून बसलाय… अशा परिस्थितीत लोक विचारतायेत कुठे आहेत ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होताच आंदेकर टोळीने शुक्रवारी रक्तरंजित बदला घेतला. पुण्यातील नाना पेठ परिसरात श्री लक्ष्मी हाउसिंग सोसायटी इमारतीच्या पार्किंगमध्ये शनिवारी रात्री पावणेआठ वाजता झालेल्या खुनी हल्ल्यात वनराज आंदेकरच्या खुनाचा मुख्य आरोपी गणेश कोमकर याच्या 19 वर्षीय मुलाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. गोविंद कोमकर असे मृताचे नाव असून त्याला तीन गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
मागील वर्षी 1 सप्टेंबर 2024 रोजी नाना पेठेत वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला. यात वनराजच्या बहिणीचा दीर असलेला गणेश कोमकर हा मुख्य आरोपी आहे. या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर गटाने रेकी करून गोविंद कोमकर याला लक्ष्य केल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. विशेष बाब म्हणजे टोळीने रेकी एका भागात केली व प्रत्यक्ष लक्ष्य दुसऱ्या ठिकाणी साधले. त्यामुळे पोलिसांनाही गुन्ह्याचा तपास गुंतागुंतीचा झाला असून खून रोखण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना अपयश आले आहे. दरम्यान, पुण्यात बंडू आंदेकर टोळी विरुद्ध सूरज ठोंबरे टोळी असे वैर वाढले आहे. हा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. आंदेकर टोळीने 2023 मध्ये ठोंबरे टोळीचे शुभम दहिभाते आणि निखिल आखाडेवर नाना पेठेत हल्ला केला होता. या हल्ल्यात निखिल आखाडेकर याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ठोंबरे टोळीत संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी ठोंबरे टोळीने आंदेकर टोळीचा ‘बॅकबोन’ म्हणून ओळख असलेल्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या केली होती.

