पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे. या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार , शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ ,तसेच संदीप खर्डेकर, शिवाजी खेडेकर यांनी गणपतीचे आशिर्वाद घेतले.

बाप्पा सर्वांच्याच इच्छा पूर्ण करतो, असे मानले जाते. त्यामुळेच महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भल्या पहाटे पुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीची पूजा व अभिषेक केला. प्रत्येकाच्या मनातील इच्छा पूर्ण होवो, असे साकडे आपण बाप्पाला घातले असल्याचे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या माध्यमातून अजित पवार यांनी गणपती बाप्पाला मुख्यमंत्री होण्यासाठी साकडे घातले का? याची चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री होण्यासाठी बाप्पाला साकडे घातले का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी विचारला होता. यावर उत्तर देताना अजित पवार यांनी देखील तुमच्या मनात जे आहे ते पूर्ण होवो, तसेच प्रत्येकाच्या मनातील इच्छा पूर्ण होवो. अशी प्रार्थना आपण बाप्पा चरणी केली असल्याचे म्हटले आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गणेशाची पूजा व अभिषेक अजित पवार यांनी आज सकाळी केला. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.
गणेशोत्सवाचे दहा दिवस बघता-बघता कसे निघून गेले हे कोणाच्याही लक्षात आले नाही. इतके सगळे तल्लीन होऊन गणेशोत्सवात सहभागी झाले होते. आजच्या अखेरच्या दिवशी देखील वेळेमध्ये गणेश विसर्जन व्हावे, यासाठी सर्वांनी मदत करावी, सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तुमच्या मनात जे आहे ते तुमच्या मनासारखे होवो. इतरांच्या मनात जे आहे ते त्यांच्या मनासारखे होवो. अशीच मागणी आपण दगडूशेठ हलवाई गणपती चरणी केली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
गणेश विसर्जन निमित्त दगडुशेठ गणपती हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मला अभिषेक करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार अभिषेकासाठी सकाळीच या ठिकाणी मी आलो. या ठिकाणी अभिषेक केला आहे. सर्वच ठिकाणी सुख शांती नांदावी, अशी प्रार्थना यावेळी गणरायांना केली. प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा, आकांक्षा असतात. त्या पूर्णत्वाला जाव्यात, अशी प्रार्थना केली. आपला फुले- शाहू- आंबेडकरांचा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, अशी मागणी बाप्पा चरणी केली असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
राज्यातील काही भागामध्ये जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे तेथील शेतकरी बळीराजा अडचणीत आहे. शेतकरी या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासन देखील प्रयत्नशील आहे. अतिशय आनंदात गणेशोत्सवाचे नऊ दिवस गेले आहेत. आजचा दहावा दिवस देखील कुठेही गालबोट न लागू देता सर्वांनी मिरवणूक शांततेत पार पाडावी. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. तसेच जबाबदार नागरिकांनी देखील आपापले काम योग्य पद्धतीने पार पाडावे. आज गणेश विसर्जन शांततेत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

