अफवांवर विश्वास ठेऊ नका
मुंबई पोलीस गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यास सक्षम
मुंबई-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना मोठी धमकी मिळाली आहे. व्हॉट्सॲपवरून ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत नंबरवर पाठवलेल्या संदेशात शहरात भीषण बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दावा करण्यात आला आहे. या संदेशामुळे सुरक्षा यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्काळ शहरात हाय अलर्ट जारी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धमकीच्या संदेशात 34 वाहनांत बॉम्ब लावल्याचा उल्लेख आहे. यासोबतच, तब्बल 400 किलो RDX आणण्यात आले असून त्याद्वारे एक कोटी लोकांना ठार मारण्याची क्षमता असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर, 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचेही या संदेशात आहे.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या व्हॉट्सॲप नंबरवरून हा मेसेज पाठवण्यात आला होता. तो नंबर शोधण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. “मुंबई पोलिस नेहमीच सतर्क आहेत आणि आम्ही सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत. जनतेने घाबरू नये, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि सर्व काही शांत आहे.” अशी धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही.
या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने पावले उचलली. शहरात सर्वत्र नाकेबंदी, संशयित वाहनांची तपासणी आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर सुरक्षा कडेकोट करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर भाविक मुंबईत दाखल होत असल्याने, पोलिसांनी मंडप परिसर, रेल्वे स्थानके, विमानतळ, बाजारपेठा आणि गर्दीच्या भागांमध्ये गस्त वाढवली आहे.
दरम्यान, सायबर सेल आणि दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मिळालेल्या संदेशाचा सखोल तपास सुरू केला आहे. हा संदेश खरा आहे की खोटा, याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक मदतीचा वापर करत आहेत. अशा प्रकारे मिळणाऱ्या धमक्या अनेकदा खोट्या निघाल्या असल्या तरी, पोलिस अलर्ट मोडवर आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे, तसेच कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळल्यास लगेच पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे.

