बारामती- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळावर आता खासदार सुप्रिया सुळे यांच्याऐवजी खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.
2021 मध्ये महा विकास आघाडी सरकार असताना या मंडळावर सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, राज्यातील सत्तांतरानंतर हा बदल करण्यात आला आहे. अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षा म्हणून आता सुनेत्रा पवार काम पाहणार आहेत. या पदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो.
मंडळातील सदस्य:
सुनेत्रा अजित पवार (अध्यक्ष), ज्योती नवनाथ बल्लाळ, डॉ. कीर्ती सतीश पवार, डॉ. सचिन कोकणे, ॲड. श्रीनिवास वायकर, डॉ. दिलीप लोंढे, अविनाश गोफणे आणि बिरजू मांढरे या नऊ सदस्यांची या मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारिणीवर सुप्रिया सुळे यांची नियुक्ती होती, पण आता राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
मंडळाची प्रमुख कार्ये
कर्मचाऱ्यांवर नियंत्रण: कर्मचाऱ्यांची अनियमितता, उशीर किंवा गैरवर्तन यावर लक्ष ठेवून त्यात सुधारणा करण्यासाठी शिफारसी करणे.
देणग्या स्वीकारणे: राज्य सरकारवर अतिरिक्त भार न टाकता, रुग्णालयासाठी जनतेकडून देणग्या गोळा करणे आणि स्वीकारणे.
राष्ट्रीय कार्यक्रमांचा आढावा: आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे.
दोष निवारण: रुग्णालय परिसराची तपासणी करून आढळलेले दोष दूर करण्यासाठी उपाय सुचवणे.
व्यवस्थापनात सुधारणा: मंडळाला रुग्णालयाच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी योग्य मार्ग आणि साधने सुचवण्याचा अधिकार आहे.
जनतेच्या तक्रारी: रुग्णालयाशी संबंधित जनतेच्या तक्रारींचा अभ्यास करून त्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवणे.
आर्थिक देखरेख: विविध विभागांसाठी मंजूर झालेल्या निधीचा योग्य वापर होत आहे की नाही, यावर मंडळ लक्ष ठेवेल.
सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांची तयारी?
सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली. यानंतर त्यांनी राज्यसभेच्या तालिका सभापती निवड करण्यात आली. तर आता बारामती मेडिकल कॉलेजच्या अभ्यागत मंडळावर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्यानंतर आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सक्षम पर्याय म्हणून सुनेत्रा पवार यांना अजित पवार पुढे आणत आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी मी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे निवडणूक होई दिली ही माझी चूक झाली असे म्हटले होते. पण बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवारांच्या रुपाने नवा पर्याय तयार करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

