वाघोलीतील वीजग्राहकांना नविन शाखांमुळे मिळणार दर्जेदार ग्राहक सेवा- राजेंद्र पवार
आ. ज्ञानेश्वर कटके व महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते उद्घाटन
साई सत्यम, लोणीकंद व विठ्ठचवाडी वाघोली शाखेची नव्याने निर्मिती
पुणे, दि. ५ सप्टेंबर, २०२५– वाढत्या शहरीकरणामुळे वाढलेल्या ग्राहकांना सुरळीतपणे सेवा देण्यासाठी महावितरणच्या वाघोली शाखेचे आजपासून चार शाखांमध्ये रुपांतर झाले आहे. नविन शाखांच्या माध्यमातून मनुष्यबळ वाढले आहे. त्यामुळे वाघोली भागातील वीजग्राहकांना महावितरणकडून गतिमान व दर्जेदार ग्राहकसेवा मिळणार असल्याचे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी केले.
शिरुर-हवेली मतदार संघाचे आ. ज्ञानेश्वर (माऊली) कटके व महावितरणचे संचालक (मानव संसाधन) यांच्या शुभहस्ते शुक्रवारी सकाळी या नूतन शाखांचे उद्घाटन झाले. यावेळी मार्गदर्शन करताना महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार म्हणाले, ‘आ. कटके यांनी वाघोली शाखेच्या विभाजनाची वेळोवळी मागणी केली होती. तसेच येथील समस्या मला माहिती होत्या. वाघोली परिसरात वेगाने वाढ होत असलेल्या औद्योगिकीकरण व नागरिकीकरणामुळे सध्याचे मनुष्यबळ वाढविण्यासाठी नविन शाखेची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यमान वाघोली शाखेचे विभाजन करून नवीन साई सत्यम, विठ्ठलवाडी वाघोली व लोणीकंद शाखा अशा तीन नवीन शाखा निर्माण झाल्या आहेत. तीन शाखेच्या निर्मितीमुळे 3 सहाय्यक अभियंत्यांसह 51 कर्मचाऱ्यांचे वाढीव मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. ज्यामुळे या भागातील ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देणे महावितरणला शक्य होणार आहे.’
आ. ज्ञानेश्वर कटके म्हणाले, ‘वाघोली परिसर वेगाने विकसित होत आहे. झपाट्याने वाढणाऱ्या वीज ग्राहकसंख्येमुळे उपलब्ध वीज कर्मचाऱ्यांवर ताण येत होता. त्यामुळे मी वाघोली शाखेच्या विभाजनाची मागणी लावून धरली. त्यास संचालक (मासं) राजेंद्र पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. एवढेच नव्हे तर एका शाखेच्या चार शाखा करुन त्यांनी भविष्यातील वाढत्या मागणीचाही एकप्रकारे विचार केला आहे.’
कार्यक्रमाला महावितरणचे प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता युवराज जरग, संजीव नेहते, कार्यकारी अभियंता देविदास बैकर, रविंद्र बुंदिले, धनंजय आहेर, प्रवीण पंचमुख आदींसह वीज कर्मचारी व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

