थेट परदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर : सचिन सावंत
मुंबई, दि. ४ सप्टेंबर २०२५
थेट परदेशी गुंतवणूकीत यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून या कालावधीत कर्नाटकात अधिक आली असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. फडणवीस सरकारच्या अगोदरच्या कालावधीतही कर्नाटक असाच एकदा पुढे गेला होता. यशाचे श्रेय घेताना फडणवीस पुढे य़ेतात तसेच अपश्रेय ही पुढे येऊन घ्यावे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
सचिन सावंत पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार असताना केंद्र सरकारने एका वर्षाचा कम्प्युटर हार्डवेअर सॉफ्टवेअर श्रेणीतील परदेशी गुंतवणूक जाणिवपूर्वक गुजरातला पाठवली तेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र मागे गेला अशी बोंबही देवेंद्र फडणवीस यांनी ठोकली होती. आता मात्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली सरकार असताना महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांवर आला आहे. सगळ्यात महत्त्वाची आणि गंभीर बाब म्हणजे या तिमाहीतील सर्वाधिक गुंतवणूक देशात कम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात आली आहे. यातील बहुतेक गुंतवणूक ही कर्नाटकला गेलेली दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी आयटी पार्क परिसरात जाऊन महाराष्ट्राचे वाटोळे झाले, आपले आयटी पार्क बंगळुरूला चालले आहे असे म्हटले ते सत्य ठरत आहे असे दिसते असेही सचिन सावंत म्हणाले.

