तेजेवाडी येथील ४ मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचा महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते शुभारंभ
१० गावातील २ हजार शेतकऱ्यांना फायदा
पुणे, दि. ४ सप्टेंबर, २०२५- ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ अंतर्गत तेजेवाडी येथील १२ एकर गायरानावर उभारलेल्या ४ मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचा बुधवारी (दि.३) महावितरणचे संचालक (मानव संसाधन) यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील हिवरे बु. सह पंचक्रोशीमधील दहा गावांतील शेतीपंपाना आता दिवसा वीज पुरवठा सुरु झाला असून, येथील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी यापुढे रात्री-अपरात्री शेतीमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.
राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ हाती घेतली आहे. या योजनेतून राज्यात १६ हजार मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प राज्यात होत असून, त्यातून तयार झालेली वीज शेतकऱ्यांना दिवसा दिली जात आहे. या योजनेतूनच जुन्नर तालुक्यातील हिवरे बु. ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रांतर्गत ५ किमी परिघातील तेजेवाडी येथे १२ एकर गायरान जमिनीवर ४ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. या सौर प्रकल्पात तयार झालेली वीज हिवरे बु. उपकेंद्राला जोडून त्यांतर्गत येणाऱ्या १० गावांना आता दिवसा विजेचा लाभ मिळणार आहे. बुधवारी (दि. ३) महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ झाला. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल काकडे अधीक्षक अभियंते युवराज जरग, अनिल घोगरे व संजीव नेहते, कार्यकारी अभियंते राहूल गवारे, केशव काळुमाळी, धनंजय अहेर व प्रवीण पंचमुख, तेजेवाडीचे सरपंच संपत सखाराम नायकोडी व उपसरपंच राजू विश्वासराव यांचेसह महावितरणचे अधिकारी, कर्मचारी तसेच मे. आवाडा कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
या गावांना होणार फायदा
या सौर प्रकल्पामुळे बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी, ओझर, हिवरे बु., हिवरे खु., शिरोली खु.,शिरोली बु., कुरण, ढोळवाडी, भोरवाडी आदी १० गावांतील २ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महावितरण कटिबद्ध- राजेंद्र पवार
तेजेवाडी हा मंचर विभागातील तिसरा सौर प्रकल्प आहे. यापूर्वी पेठ (ता. आंबेगाव) व नेतवड (ता. जुन्नर) येथे अनुक्रमे ४ व ८ मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करुन तेथील स्थानिक शेतकऱ्यांना महावितरणने कायमस्वरुपी दिवसा वीज उपलब्ध करुन दिली आहे. ह्या भागात बिबट्यासह अनेक जंगली श्वापदे आहेत. पूर्वी रात्री-अपरात्री मिळणाऱ्या विजेमुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाताना अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते. मात्र आता सौर वाहिनी योजनेतील प्रकल्प पूर्ण झाल्याने या भागात शेतीला दिवसा वीज मिळणार असून, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असल्याचे संचालक राजेंद्र पवार यांनी सांगितले.

