कै. शशिकांत ठाकूर यांच्या स्मरणार्थ लोकशिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न
पुणे : माणसाच्या शरीरात जसे रक्त वाहते, तसे आपल्या भारतीय संस्कृतीत लोककलेचे दर्शन घडते. आज गणेशोत्सवात ढोल-ताशा वादन, लेझीम पथक, दारासमोरील रांगोळी किंवा तोरण हे सर्व काढून टाकले, तर उत्सवातील जिवंतपणा नाहीसा होईल. त्यामुळे आपली संस्कृती आणि लोककला हा उत्सवाचा प्राण आहे, असे मत कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्र एज्युकेशन कौन्सिलचे सदस्य अभय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, सेवा मित्र मंडळ आणि ठाकूर परिवाराच्या वतीने कै. शशिकांत ठाकूर यांच्या स्मरणार्थ लोकशिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.शिक्षक दिनाच्या निमित्ताने या पुरस्काराचे वितरण होते.हे पुरस्काराचे अठरावे वर्ष आहे.यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ कला अध्यापक व चित्रकार दत्तात्रय वेताळ यांना महात्मा फुले पेठेतील त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला.
यावेळी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष नितीन होले, शिरीष मोहिते, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, रंगावलीकार अमर लांडे, वंदना वेताळ आदी मान्यवर उपस्थित होते. शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. सनई चौघड्याचे मंगल वादन, दारात रांगोळी, दाराला तोरण बांधून हा सोहळा साजरा करण्यात आला.
पराग ठाकूर म्हणाले, लोककलेची पारंपरिकता व शुद्धता जतन करणे हे लोककलावंतांचे काम आहे. पुढच्या पिढीमध्ये देखील ही कलाप्रवाहित करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. यावेळी त्यांनी आपले वडील शशिकांत ठाकूर यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला.
दत्तात्रय वेताळ म्हणाले, प्रत्येकामध्ये एक तरी कला असतेच ती कला जोपासण्यासाठी तुम्हाला सातत्याने सराव हा महत्त्वाचा असतो. कला अंगी असली तरी ती सरावानेच खुलते असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी व आभार प्रदर्शन शिरीष मोहिते यांनी केले.

