मुंबई-वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मनोज जरांगे यांच्यासह सर्वांनाच गंडवल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ‘कुणबी’ संबोधण्याचा जीआर काढून मोठा गाजावाजा केला. भाजपने असा आव आणला की, न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला. मात्र प्रत्यक्षात हा निर्णय गंडवणारा व फसवणारा आहे, असे ते त्यांनी म्हटले आहे. आंबेडकरांनी याविषयी हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाच्या विविध निर्णयांचा दाखला दिला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न खरेच सुटला काय? याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण केले. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने एक जीआर काढला. त्या जीआरद्वारे सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केल्याची घोषणा केली. या जीआरमुळे मराठवाड्यातील सर्वच मराठा समाजाचे कुणबीमध्ये रुपांतर होऊन त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळेल असा दावा केला जात होता. पण आता या जीआरवर वेगवेगळी मतमतांतरे येत आहेत. कायदेतज्ज्ञ तथा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही सरकारचा हा जीआर गंडवणारा व फसवणारा असल्याचा आरोप केला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपने सर्वांनाच गंडवले आहे! महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ‘कुणबी’ संबोधण्याचा जीआर काढून मोठा गाजावाजा केला. भाजपने असा आव आणला की, न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला. मात्र हा निर्णय गंडवणारा व फसवणारा आहे. “भाजपने मराठा आरक्षणासाठीची नेमलेली शासकीय उपसमिती, न्या. शिंदे समिती, मराठा समाज, मनोज जरांगे पाटील आणि कुणबी या सर्वांना फसवले आहे.”
जगन्नाथ डी. होल विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार या प्रकरणातील मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालात, न्यायालयाने पॅराग्राफ 13 मध्ये म्हटले आहे की, सर्व मराठा समाजाला कुणबी संबोधता येणार नाही. त्याआधीच्या पॅराग्राफमध्ये “कुणबी ही जात नसून व्यवसाय आहे” असे न्यायालयाने स्पष्ट नमूद केले आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयातही टिकला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केलय की, सर्व मराठा हे कुणबी आहेत, असं सरसकट धरता येत नाही. त्यामुळे भाजपने जीआर मार्गे काढलेला निर्णय चुकीचा व दिशाभूल करणारा आहे.
“ओबीसींना स्वतःच्या हक्कासाठी आता लढा द्यावा लागेल. आंदोलन, मोर्चे, बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसी मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये दबाव आणणे गरजेचे आहे.”
वंचित बहुजन आघाडीची ठाम भूमिका आहे की, मराठा आरक्षणाचे ताट वेगळे आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे. मराठा समाजाचे ताट वेगळे असले तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते. मात्र, शासनाने सर्व मराठे कुणबी समजावेत, असा जीआर काढून भाजपने अजित पवार, एकनाथ शिंदे व उबाठा, मराठा समाज यांनाही गंडवले आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

