मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती मंडळातर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
पुणे: ‘बांगड्या भरल्यात का?’ असे पूर्वी पुरुषांबाबत म्हटले जायचे. तो समज खोडून काढणाऱ्या आणि बांगड्या नसतानाही मनगटांमध्ये किती सामर्थ्य आहे हे सिद्ध करणाऱ्या महिला आज आपल्या समोर आहेत. महिला या उत्तम व्यवस्थापन गुरू आहेत. असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.
मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. तुळशीबाग गणपती उत्सवमंडपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाच्या विश्वस्त अभिनेत्री वाळके, अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम उपस्थित होते.
मुक्ताबाई नाटिकेच्या क्षेत्रात सलग ३० वर्षे योगदान तसेच आयुर्वेदिक वैद्यकात कार्यरत डॉ. प्रचिती सुरु कुलकर्णी, वित्तीय आणि गुंतवणूक क्षेत्रात मार्गदर्शन करणाऱ्या वैशाली भागवत, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सीमा पुणतांबेकर, सुर्यदत्ता संस्थेच्या संस्थापक सुषमा चोरडिया, पत्रकार अंजली खमितकर यांचा सन्मान करण्यात आला. सन्मान चिन्ह, उपरणे असे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या, केवळ स्वतःपुरते न बघता. वैश्विक दृष्टिकोन ठेऊन काम करणाऱ्या महिलांचा सन्मान तुळशीबाग गणपती मंडळाने केला. स्वातंत्र्य लढ्यात कितीतरी सत्याग्रही स्त्रिया बाहेर आल्या, लढा दिला. आपल्या कार्याचा गाजावाजा करत नाहीत. याचा अर्थ त्यांना जाणीव नाही असा नाही; हीच जाणीव आज पुरुषांनी पुढे आणली आणि कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला.
नितीन पंडित म्हणाले, गणेशोत्सवात प्रामुख्याने पुरुष हे मोठ्या संख्येने मंडळांमध्ये कार्यरत असतात. तुळशीबाग गणपती मंडळातर्फे गणेशोत्सवात दरवर्षी एक दिवस महिला उत्सवाचे नियोजन करतात आणि सर्व कामकाज पाहतात. याच दिवशी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून त्यांचे असामान्य कार्य समाजापुढे पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून आणले जाते, असेही त्यांनी सांगितले. डॉ. शैलेश गुजर यांनी सूत्रसंचालन केले.

