पुणे, दि. ३ : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यरत ग्रंथालय संचालनालयामार्फत सन २०२४-२५ या वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार, डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्काराकरिता ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, नागरिकांना उत्कृष्ट ग्रंथालयीन सेवा मिळावी आणि वाचनसंस्कृतीला चालना मिळावी या उद्देशाने दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. शहरी व ग्रामीण विभागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ड’ वर्गातील उत्कृष्ट ग्रंथालयांना अनुक्रमे १ लाख, ७५ हजार, ५० हजार व २५ हजार रुपये इतकी रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात येतो. त्याचबरोबर राज्यातील एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी ५० हजार रुपये तर प्रत्येक महसुली विभागातून निवडलेल्या उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी २५ हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट दिली जाईल.
इच्छुक ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह विहीत मुदतीत तीन प्रतींमध्ये आपल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

