देशासह राज्यात वाढती बाजारपेठ, कमी किंमतीत उत्पादनाचे ठिकाण आणि कुशल मनुष्यबळाचे स्रोत लक्षात घेता देशात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे स्थानिक, राष्ट्रीय, जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. या संधींच्या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थेत शाश्वत वृद्धी आणि विकास होण्यासाठी प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ असणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर विविध उद्योग व इतर क्षेत्रांतील रोजगाराच्या संधींचा तरुण वयोगटातील उमेदवारांना लाभ घेता यावा, अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानानुरुप कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे उत्पादनक्षम बनविण्याच्यादृष्टीने “कौशल्य विकास” कार्यक्रमास राष्ट्रीय प्राधान्य देवून राष्ट्रीयस्तरावर कौशल्य विकास कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘स्किल इंडिया’ संकल्पनेनुसार राज्य शासनाने “कुशल महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट्र” हे ध्येय समोर ठेवले आहे. यामाध्यमातून बेरोजगारांना रोजगारक्षम करणे, उद्योगांना प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे या उद्देशाने बेरोजगार युवक-युवतींना, कामगार वर्गाला उद्योगधंद्यात लागणारी कौशल्य विकसित करण्याकरिता कौशल्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील युवक-युवतींच्या अंगी असलेल्या कौशल्याचा विकास आणि त्यामाध्यमातून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यात येत आहे. कुशल मनुष्यबळ असलेल्या क्षेत्रांमध्ये लागणारे मनुष्यबळ उपलब्धीकरिता बेरोजगार युवक-युवतींकरिता जिल्ह्यातील प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
कौशल्य विकास प्रशिक्षणाकरिता राज्यातील १५ ते ४५ वयोगटातील उमेदवारांची राज्य शासनाच्या प्रशिक्षण संस्थेच्यावतीने अभ्यासक्रमनिहाय निवड करण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने समाजातील अनुसूचित जाती-जमाती, महिला, दिव्यांग, अल्पसंख्यांक आदी घटकांच्या सहभागावर विशेष भर देण्यात येत आहे. या प्रशिक्षण संस्थेद्वारे उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येते. प्रशिक्षणाअंती उमेदवारांना विविध खाजगी आस्थापनांमध्ये ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ची सुविधा प्रशिक्षण संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात येते.
कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याच्याउद्देशाने जिल्ह्यातील महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील एकूण ५० महाविद्यालये यामध्ये सहभागी असून त्यापैकी १३ महाविद्यालयांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत या महाविद्यालयात ७५८ उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत, ३० उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे तसेच प्रशिक्षण कालावधीत एकूण २४ उमेदवारांनी आंतरवासिता पूर्ण केली आहे.
ग्रामीण भागातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्याकरिता प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ३० प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचे कामकाज करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ८७६ उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत तर ९६७ उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
युवकांनो, राज्य शासनाच्यावतीने रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने कौशल्य विकासाअंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान धर्तीवर आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, किमान कौशल्य विकास कार्यक्रम, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आदी कौशल्य विकास योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाच्या धर्तीवर आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. सोबतच पंडित दीनदयाळ उपाध्याय मेळाव्याचे आयोजनाच्यामाध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगारासाठी सहाय्य करण्यात येत आहे. या संधीचा लाभ घेण्याकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे तसेच कार्यालयाच्या ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा punerojgar@gmail.com या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा.
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र :
- सुरेश वराडे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास
‘कुशल महाराष्ट्र, रोजगार युक्त महाराष्ट्र” या राज्य शासनाच्या ध्येयानुसार तसेच सद्यस्थितीत कुशलतेला प्राप्त झालेल्या महत्त्वानुसार, जिल्ह्यातील रोजगार शोधक युवक-युवतींना याद्वारे आवाहन करण्यात येते की, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विषयक विविध योजना अंतर्गत कौशल्य प्रशिक्षण घेऊन आपली रोजगार क्षमता वाढवावी.’
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

