▪️ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उदघाटन
पुणे, : पंचायत राज संस्थांना सक्षम, गतिमान व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन ४ सप्टेंबर २०२५ रोजी गणेश कला क्रिडा, पुणे येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार करणार असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हा “सर्वांना सोबत घेवून चला” या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या ध्येयावर आधारित उपक्रम असून त्याचे प्रमुख घटक सुशासनयुक्त पंचायत निर्माण करणे, पंचायत संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, जलसमृद्ध व हरित गावांची निर्मिती, मनरेगा व इतर योजनांचा अभिसरण, ग्रामपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण, उपजीविका व सामाजिक न्याय सुनिश्चित करणे तसेच लोकसहभागातून लोकचळवळ निर्माण करणे असे आहेत.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणे जिल्हा परिषदेमार्फत सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच तालुका व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी यांना कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम पंचायत राज संस्थांच्या सामर्थ्यवर्धनासाठी, विविध योजनांचा समन्वय व अंमलबजावणीसाठी तसेच स्थानिक लोकांच्या सक्रिय सहभागासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून यामुळे ग्रामीण भागातील विकासाला नवे बळ मिळेल.

