पुणे, दि. २:: शांघाई येथे सन २०२६ मध्ये आयोजित होणा-या जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ६३ क्षेत्रांशी संबंधित कौशल्य स्पर्धा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्कील कौन्सिल, विविध औदयोगिक आस्थापना यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य तसेच देश पातळीवर करुन निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष आहे. ॲडीटिव्ह मॅन्युफॅक्चरींग, क्लाऊड कंप्युटिंग, सायबर सुरक्षा, डिजीटल कंस्ट्रक्शन, इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नोलॉजी, मेकॉट्रॉनिक्स, रोबोट सिस्टम इंटिग्रेशन, वॉटर टेक्नोलॉजी, आयसीटी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्री ४.० , ऑप्टोइलेक्ट्रानिक टेक्नोलॉजी, डेंटल, प्रोथेस्टिक्स आणि एअरक्राफ्ट मेंटेनंस या क्षेत्राकरिता उमेदवारांचा जन्म १ जानेवारी २००१ किंवा त्यांनतरचा असणे आवश्यक आहे. इतर 50 क्षेत्राकरिता उमेदवारांचा जन्म १ जानेवारी २००४ किंवा त्यांनतरचा असणे आवश्यक आहे.
सर्व शासकीय आणि खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्था, एमएसएमई, दूल रुम्स, सिपेट, आयआयटी, अभियांत्रिकी महाविदयालये, तंत्रनिकेतन महाविदयालये, आयएचएम/हॉस्पिटॅलिटी इन्स्टिट्यूट्स, कॉर्परिट टेक्निकल इन्स्टिट्यूट, स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र राज्य कौशल्य विदयापीठ, एमएसबीवीईटी, खाजगी कौशल्य विदयापीठ, फाइन आर्टस कॉलेज, फ्लॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूट ऑफ ज्वेलरी मेकिंग तसेच इतर सर्व महाविदयालये व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था मधील उमेदवारांना स्पर्धेकरिता नोंदणी करता येईल.
इच्छुक उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in/ या वेबपोर्टलला भेट देऊन ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी नाव नोंदणी करावी. जिल्हयातील सर्व संबंधित संस्थांनी पुढाकार घेऊन कौशल्य स्पर्धेबाबतची माहिती अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहोचवावी असे, आवाहन सु.रा.वऱ्हाडे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

