मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मराठा कोअर कमिटीला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पोलिसांनी 1 सप्टेंबर रोजी आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशांचे आणि आंदोलनासाठी घालून दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलकांनी आझाद मैदान रिकामे करावे, असेही या नोटिशीत म्हटले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्यासह शहरभर विशेषतः दक्षिण मुंबईत भटकंती करणाऱ्या मराठा आंदोलकांना मुंबई ठप्प तसेच मुंबईकरांची गैरसोय करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात सुनावले आहे. तसेच परवानगीशिवाय गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर कारवाई करण्याचे देखील न्यायालयाने आदेश दिले आहेत. रस्ते, पदपाथ तसेच रेल्वे स्थानक मोकळे व स्वच्छ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई पोलिसांनी मराठा आरक्षण कोअर कमिटीला नोटीस बजावल्यानंतर, त्याच वेळी न्यायालयाने राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला खारघरमध्ये परवानगी देण्याची स्पष्ट सूचना न्यायालयाने दिली असतानाही, सरकारने त्याची अंमलबजावणी का केली नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली होती.
आंदोलन करण्यासाठी पोलिस आणि न्यायालयाने दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी मागितलेल्या आंदोलनाच्या पुढील परवानग्या नाकारण्यात आल्या आहेत. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला पाठवलेल्या नोटिशीत, नियमांचे उल्लंघन झाल्याचा उल्लेख करत मैदान तात्काळ खाली करण्याचे म्हटले आहे. त्यामुळे जरांगे पाटील आता कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जरांगेंच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईत गोंधळ- डावखरे:भाजपचे नेते निरंजन डावखरे म्हणाले की, मित्रांनो,जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांमुळे आंदोलनाच्या नावाखाली मुंबईत होणारा गोंधळ आणि धुडगूस यामुळे मराठा समाजाची प्रतिमा मलिन होत आहे.वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि सर्वसामान्यांना होणारी गैरसोय यामुळे मराठा समाजाबद्दल गैरसमज पसरू शकतात. महिला पत्रकारांची छेड काढण्यासारख्या लज्जास्पद घटनांमुळे समाजाच्या संस्कृतीलाही गालबोट लागत आहे.मनोज जरांगे पाटील यांनी शांततेत आंदोलन आवाहन केले असताना, त्यांच्या कार्यकर्त्यांनी किमान त्यांच्या आदेशाचे पालन तरी करावे, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
मुंबई पोलिसांनी नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय?
प्रति,
आमरण उपोषण अंतरवाली सराटी,
ता. अंबड, जि. जालना.
1) श्री. किशोर आबा मरकड (कोर कमिटी सदस्य),
2) श्री. पांडुरंग तारक (कोर कमिटी सदस्य),
3) श्री. शैलेंद्र मरकड (कोर कमिटी सदस्य),
4) श्री. सुदाम बष्पा मुकणे (कोर कमिटी सदस्य),
5) श्री. बाळासाहेब इंगळे (कोर कमिटी सदस्य),
6) श्री. अॅड. अमोल लहाणे (कोर कमिटी सदस्य),
7) श्री. श्रीराम कुरणकर (कोर कमिटी सदस्य),
8) श्री. संजय कटारे (कोर कमिटी सदस्य),
ज्याअर्थी, मा. मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. 25656/2025 (अॅमी फॉऊंडेशन वि. महाराष्ट्र राज्य व इतर) च्या सुनावणीमध्ये दिनांक 26/08/2025 रोजी दिलेल्या आदेशात खालीलप्रमाणे निर्देश दिले होते :-
1) प्रतिवादी क्र. 05, 06 व 07 म्हणजेच आपण स्वतः, श्री. विरेंद्र पवार व आमरण उपोषण अंतरवाली सराटी, यांनी “जाहिर सभा, आंदोलने व मिरवणूका नियम, 2025 अन्वये सक्षम प्राधिकारी यांची परवानगी प्राप्त केल्याशिवाय आझाद मैदान, मुंबई येथे कोणतेही आंदोलन करू नये.
२) प्रतिवादी यांना असे आंदोलन करावयाचे असल्यास त्यासाठी त्यांनी “जाहिर सभा, आंदोलने व मिरवणूका नियम, 2025” अन्वये अर्ज सादर करावा.
३) मुंबई शहरातील जनजीवन विस्कळीत होवू नये यासाठी प्रतिवादी यांना खारघर, नवी मुंबई या ठिकाणी आंदोलन करण्यास पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने विचार करावा.
४) सक्षम प्राधिकारी यांनी प्रतिवादी यांना “जाहिर सभा, आंदोलने व मिरवणूका नियम, 2025 अन्यये आंदोलन करण्यास परवानगी दिल्यास सक्षम प्राधिकारी यांनी घालून दिलेल्या सर्व अटी व शर्तीचे पालन प्रतिवादी करतील.
आणि ज्याअर्थी, तद्नंतर आपण केलेल्या अर्जानुसार दि. 29/08/2025 रोजी सकाळी 9:00 ते 18:00 वा. दरम्यान आझाद मैदान, मुंबई येथे आपल्या मागण्यांकरीता एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी या कार्यालयाचे पत्र कमांक 7608/2025, दिनांक 27/08/2025 अन्यये आपणांस देण्यात आली होती. नमूद परवानगी देताना आपणांस “जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका (अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, मुंबई यांच्या अधिकार क्षेत्रात) नियम, 2025” व मा. मुंबई उच्च न्यायालय यांचे उपरोक्त नमूद प्रकरणातील दि. 26/08/2025 रोजीचे अंतरिम आदेशाची माहिती देण्यात आली होती. तसेच तत्पूर्वी आपणास दिनांक 26/08/2025 रोजीचे पत्राद्वारे मा. उच्च न्यायालयाचे उपरोक्त जर अंताि चाहे “जारमा आंदोलने व मिरवणका नियम 20275 या नियमावलीची पत देखील देण्यात आली.
आपणास यापूर्वी आंदोलन करण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीतील अटी व शर्तीचे आपण उल्लंघन केलेले असल्यामुळे तसेच, मा. मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक 26/08/2025 रोजीच्या त्यांच्या अंतरिम आदेशामध्ये दिलेल्या निर्देशांचे आपण उल्लंघन केलेले असल्याने, दिनांक 01/09/2025 रोजी आपण सादर केलेल्या विनंती अर्जानुसार (या पोलीस ठाण्याचे आवक क्रमांक 1135/9/2025, दिनांक 01/09/2025) आपण मागितलेली आंदोलनाबाबतची परवानगी याद्वारे नाकारण्यात येत आहे. त्यानुसार आपण आझाद मैदान परिसर लवकरात लवकर रिक्त करावा.
नोटीशीत पोलिसांनी काय निर्देश दिले आहेत?
मराठा आंदोलनकारींनी जाहिर सभा, आंदोलने व मिरवणूका परवानगी शिवाय आझाद मैदान, मुंबई येथे कोणतेही आंदोलन करू नये.

