पुणे : अखिल मंडई मंडळाने यंदा गणेशोत्सवात कृष्णाला प्रिय असणाऱ्या २१०० तुळशी रोपांचे वाटप दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना केले. मंडळाचे गणेशोत्सवाचे १३२ वे वर्ष असून राधाकृष्णाच्या जीवनावर आधारित आकर्षक ‘कृष्णकुंज’ हा देखावा साकारण्यात आला आहे. त्यानिमित्त कृष्णाला प्रिय असणारी तुळस गणेश भक्तांना देण्यात आली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, सुचेता थोरात, सुजाता शिंदे, श्रावणी काळभोर, हर्षवर्धन काळभोर, किरण जगताप, तुषार शिंदे, सूरज थोरात, सावी शाह, रुही शाह, सिद्धी थोरात तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात म्हणाले, कृष्णाला तुळस प्रिय आहे. तिच्याशिवाय श्रीकृष्णाचे पूजन अपूर्ण मानले जाते. तुळशी ही केवळ धार्मिकच नव्हे तर औषधी दृष्ट्याही उपयुक्त आहे. तुळस ही श्रद्धेचे प्रतीक आहे त्यासोबतच तिच्या औषधी गुणांमुळे ती प्रत्येक घरात उपयुक्त ठरते. म्हणूनच गणेशोत्सवात गणेश भक्तांना तुळशीची रोपे देण्यात आली आहेत.

