पुणे-कोर्टाच्या आदेशाचे पालन करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. बैठकीत आम्ही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळ्या पर्यायांचा विचार केला तसेच या बाबी कोर्टात कशी टिकेल यावर चर्चा करण्यात आली. महिला पत्रकारांचा विनयभंग हे कुठेतरी गालबोट असल्यासारखे आहे. मराठा समाजाच्या आंदोलनात असे कधी झाले नाही. परंतु, हे अतिशय निंदनीय असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पुण्यात एका पुलाच्या उद्घाटनावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर जात मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावर प्रश्न विचारण्यात आला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकीय पोळी भाजणे बंद केले पाहिजे. त्यांची सत्ता असताना त्यांनी मराठा समाजासाठी का काही केले नाही? जे काही केले ते मी आणि एकनाथ शिंदे यांनी केले आहे, असे फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षणाचा मुद्दा हा कायद्याच्या अखत्यारीत असून केंद्राच्या हातात नाही. पहिल्या दिवशी जे काही आंदोलकांनी धुडगूस घातला त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती. मग लगेच आम्हाला उपाशी ठेवण्याचा आरोप करण्यात आला. पण तसे काही नव्हते, काही लोकांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला होता म्हणून दुकाने बंद करण्यात आली होती. आम्ही त्या व्यापाऱ्यांना सांगितले की आम्ही इथे पोलिस संरक्षण देऊ आणि दुकाने उघडी ठेवण्यात यावी आणि आता दुकाने उघडी आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात दाखल याचिकेवर सुनावणीत आज उच्च न्यायालयाने काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. आता कोणालाही मुंबईत येऊ देऊ नका, असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. तसेच उद्या 4 पर्यंत जिथे रस्ते अडवण्यात आले आहेत त्या सर्व ठिकाणांवर आंदोलकांना हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

