पुणे–एकीकडे महागाई, दुसरीकडे आर्थिक पिळवणूक किंवा बेरोजगारी या चक्रात अडकलेल्या सर्वसामान्य नागरिकांची दैना होऊ लागली आहे , या महागाईची झळ सणासुदीच्या दिवसात चाेरट्यांनाही पाेहचल्याचे पाहवयास मिळते. कारण, पुण्यातील एका किराणा माल दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी चक्क तेलाचे चार डब्बे चोरून नेल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी अनाेळखी चोरट्यांविरुद्ध पर्वती पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत किराणा माल विक्रेत्याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचे सिंहगड रस्त्यावरील दत्तवाडी परिसरात किराणा माल विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील तेलाचे चार डब्बे चोरून चोरटे पसार झाले. दुकानातून तेलाचे डब्बे चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने ३१ ऑगस्ट राेजी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चोरलेल्या चार डब्ब्यांची किंमत आठ हजार रुपये असल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक एस शेख पुढील तपास करत आहेत.

