पुणे-३७ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये जुळ्यांचे संमेलन हा अभिनव कार्यक्रम मंगळवार दि. २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न होणार आहे. यामध्ये १२५ हून अधिक जुळ्यांची नाव नोंदणी झाली असून ५० हून अधिक जुळ्यांच्या जोड्या पालक व मित्रपरिवारासह प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. तसेच “जगाची जुळ्यांची राजधानी” असा उल्लेख होणाऱ्या केरळ मधील कोडिन्ही गावाच्या सरपंच श्रीमती तसलीना यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून माजी खा. अॅड. वंदना चव्हाण उपस्थित राहणार आहेत.पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई व बालगंधर्व रंगमंदिर सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू हे यावेळी उपस्थित राहतील.
बालगंधर्व रंगमंदिर येथे रॅम्बो सर्कस चे विदुषक जुळ्यांचे स्वागत करतील. नावनोंदणी व नाष्टा झाल्यानंतर सर्व जुळ्यांना एकत्र बसवून ऐतिहासिक ठरणारा फोटोही काढला जाईल. याशिवाय ३ छोटी व्याख्याने होणार आहेत. “जुळी होण्याची वैद्यकीय कारण मीमांसा” (डॉ. अरुण गद्रे), “जुळ्यांच्या संगोपनात घ्यावयाची काळजी” (डॉ. मिलिंद दुगड) आणि “जुळ्यांची भविष्य वेगळी का?” (आभा करंदीकर) यांची छोटी व्याख्याने सादर होतील. २ सप्टेंबर रोजी वाढदिवस असणाऱ्या जुळ्या बहिणींचा सत्कार, निवडक जुळ्यांची मनोगते, जुळ्यांवरील चित्रपटातील गाण्यांची चित्रफित, कोडीन्ही गावावरील चित्रफित आणि जुळ्यांवरील मनोरंजक चित्रफित यावेळी दाखवली जाईल. पुणे फेस्टिव्हलचे माध्यम समन्वयक प्रवीण प्र. वाळिंबे, श्रुती तिवारी आणि बाबू नायर यांनी ही संकल्पांना साकारली आहे. असा जुळ्यांचा कार्यक्रम पुण्यात प्रथमच होत असावा.हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.
२ सप्टेंबर रोजी जुळ्यांचे संमेलन
Date:

