मुंबई-मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचे सिद्ध करून दाखवा, असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सत्ताधारी महायुतीला दिले आहे. मनोज जरांगेंच्या मागे कुणाचा हात आहे की मराठे व ते स्वयंस्फुर्तीने आलेत हे सरकारने पाहावे. उगीच लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे राजकारण करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी गत शुक्रवारपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती काहीशी बिघडली असताना सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून त्यांच्या आंदोलनामागे महाविकास आघाडी विशेषतः शरद पवार यांच्या पक्षाचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी महायुतीला वरील आव्हान दिले आहे.
शशिकांत शिंदे म्हणाले, राज्याचे गृहखाते भाजपकडे विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असेल तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे. शरद पवार या प्रकरणी काही बोलले नाही, तर सत्ताधारी पक्षाचे नेते त्यांच्याकडे भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करतात. तसेच या आंदोलनामागे त्यांचा अदृश्य हात असल्याचाही आरोप करतात. आता मनोज जरांगे यांच्या मागे नक्की कुणाचा हात आहे की ते व मराठे स्वयस्फुर्तीने आलेत हे सरकारने बघावे. या प्रकरणी लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करू नये.
शशिकांत शिंदे यांनी यावेळी सरकारला हे आंदोलन गांभीर्याने घेण्याचेही आवाहन केले आहे. माझी सरकारला विनंती आहे. या प्रकरणी कुणाची काय भूमिका आहे हे न पाहता त्यांनी हे आंदोलन गांभीर्याने घ्यावे. सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावे. त्या समितीच्या अहवालाची वाट न पाहता सरकारच्या समितीने बैठक घेऊन तत्काळ निर्णय घ्यावेत, असे ते म्हणालेत.

