पुणे-केळीचे खुंट, नारळाच्या झावळ्या, तोरण व फुकलम (फुलांची रांगोळी) यांनी सजवलेले बालगंधर्व रंगमंदिराचे प्रवेश द्वार पारंपारिक पंचवाद्यमचा गजर , गणेश वंदनम, भरतनाट्यम, शास्त्रीय आणि अर्ध शास्त्रीय नृत्य, गाणी, तिरुवथिरकली लोकनृत्य, मोहिनीअट्टम आदी नृत्य प्रकारांद्वारे मल्याळी संस्कृतीचे दर्शन घडवणारा केरळ महोत्सव पुणे फेस्टिव्हल अंतर्गत संपन्न झाला. पुणे शहर व जिल्ह्यातील केरळवासियांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही रविवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी केरळ महोत्सव उत्साहात साजरा झाला. पुण्यातील केरळवासियांनी या कार्यक्रमास मोठी गर्दी केली होती.
केरळचे खासदार व्ही के श्रीकंदन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह पुणे मल्याळी फेडरेशनचे अध्यक्ष राजन नायर, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, मोहन टिल्लू, समन्वयक बाबू नायर, पुणे मल्याळी फेडरेशनचे उपाध्यक्ष एम व्ही परमेश्वरम व शानी नवशाद, सरचिटणीस टी.डी. जॉन, कार्यक्रम प्रमुख टी.पी. विजयन, सांस्कृतिक प्रमुख यु एन पोडूवाल, आर नायर आदींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली.
खासदार व्ही के श्रीकंदन यांचे पुणेरी पगडी घालून स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राची तुतारी आणि केरळचे चेंडमेलम यांच्या निनादाने सभागृह भारून गेले. बाबू नायर यांनी प्रास्ताविक केले. पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलमध्ये केरळ महोत्सव सातत्याने आयोजित करून राष्ट्रीय एकात्मता साधली याचे खा. व्ही के श्रीकंदन यांनी कौतुक केले व सर्वांना ओनमच्या शुभेच्छा दिल्या तसेच सुरेश कलमाडी यांच्या या योगदानाबद्दल सभागृहातील सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात सुरेश कलमाडींचे अभिनंदन केले.
यावेळी पुणे जिल्ह्यातील केरळ वासियांच्या मुले व मुली कलावंतांनी केरळच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे बहारदार नृत्याविष्कार सादर केले. त्याचबरोबर ओप्पाना (मुस्लिम एथनिक नृत्य) आणि मोर्गमकली (ख्रिश्चन एथनिक नृत्य) हे नृत्याविष्कार सादर करून केरळ संस्कृतीतील धार्मिक सलोख्याचे मनोहारी दर्शनही घडवले. ड्रग्ज विरोधी संदेश देणाऱ्या नृत्याविष्काराला देखील प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.
पुणे जिल्ह्यात ४.५ लाख केरळवासीय राहत असून त्यांच्या ३२ संस्थांच्या पुणे मल्याळी फेडरेशनचे चेअरमन राजन नायर आणि कॉ-ऑर्डिनेटर बाबू नायर यांनी याचे आयोजन केले. यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्व धर्मियांचा एकोपा दाखविणाऱ्या नृत्याविष्कारांनी प्रेक्षकांना विशेष आनंद मिळाला. या सर्व कार्यक्रमांमध्ये पुणे जिल्ह्यातील २०० हून अधिक केरळी युवक व युवती कलावंत सहभागी झाले होते.
महाराष्ट्रासारखी कर्मभूमी व केरळ सारखी मातृभूमी यांच्यात बंधूभाव वाढावा असा प्रयत्न यातून केला गेला आहे, असे पुणे मल्याळी फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजन नायर यांनी सांगितले.

