आम्हाला संपलेला पक्ष म्हणता, आंदोलन झाल्यानंतर तुमचे 250 आमदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू म्हणता
मुंबईतील जरांगे भेट व आंदोलक घेऱ्याच्या प्रकारानंतर खासदार सुप्रिया सुळे पुण्यात गणेश भेटीला.. पुणे -जरांगे पाटील यांच्यासोबत थोडक्यात चर्चा झाल्यानंतर बाहेर पडताना आंदोलकांनी त्यांच्या गाडीला घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली.या घडामोडीवर पुण्यात प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी लोकप्रतिनिधी आहे आणि माझी नैतिक जबाबदारी आहे की, आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. एखाद्या तरुणाला काही वेदना असतील तर त्याला समजून घेणं आणि त्यातून मार्ग काढणं हे माझं कर्तव्य आहे. आझाद मैदानावर फार काही झालेलं नाही. एखाद्या मुलाने हट्ट केला तर त्यात गैर काय? जरांगे पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत सुळे म्हणाल्या की, त्यांना थकवा असल्याने फक्त तब्येतीची चौकशी केली. डॉक्टरांशी सविस्तर चर्चा झाली. मुंबई महापालिका आणि सरकारने त्या परिसरातील स्वच्छतेवर लक्ष द्यावं,” अशी विनंती त्यांनी केली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. “एकीकडे आम्हाला छोटा पक्ष म्हणतात, संपलं म्हणतात आणि दुसरीकडे इतक्या मोठ्या आंदोलनाचा केंद्रबिंदू शरद पवार ठरतात. त्यांच्या पक्षाकडे 250 आमदार, 300 खासदार आहेत असं सांगत भाजप त्यांच्याकडेच वळतो ही कमालच आहे, असा टोला त्यांनी लगावला. याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत सुळे म्हणाल्या की, “सलग अकरा वर्ष भाजपचं गल्लीपासून दिल्लीपर्यंत राज्य आहे. 2018 साली फडणवीस यांनी विधानसभेत मराठा आरक्षणाची मागणी केली होती आणि उपायही सुचवले होते. आता तेच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री सत्तेत आहेत. मग त्यांनी ते उपाय अंमलात आणावेत,” अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, सरकारवर थेट निशाणा साधत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “सध्याचं सरकारच आंदोलनाला जबाबदार आहे. जर निर्णय घ्यायचाच असेल तर तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवा, कॅबिनेट घ्या आणि अधिवेशन बोलवा. आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची यादी जाहीर करा. गृहखात्याकडे माहिती असेल तर आम्हालाही द्या, नाहीतर सरकार फेल ठरेल.”

