मुंबई -मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी पहिल्यांदाच मुंबईत रस्ते कथितपणे रस्ते जाम करणाऱ्या मराठा आंदोलकांना कडक शब्दांत समज दिली आहे. रस्ते अडवल्याने किंवा रिझर्व्ह बँकेच्या समोर जाऊन घोषणाबाजी केल्याने आरक्षण मिळत नाही. सरकारने घेतलेला निर्णय कोर्टात टिकावा असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे या प्रकरणी वेळ लागत आहे, असे ते म्हणालेत.
मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी गत शुक्रवारपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी आज रिझर्व्ह बँकेपुढे जाऊन घोषणाबाजी केली. तसेच काही आंदोलकांनी शेअर बाजाराच्या इमारतीतही शिरण्याचा प्रयत्न केला. विशेषतः काही आंदोलकांनी मुंबईतील काही प्रमुख रस्त्यांवर गाड्या आडव्या लावल्या आहेत. यामुळे रहदारीचा प्रश्न उपस्थित झाला असताना मंत्री राधाकृ्ष्ण विखे पाटील यांनी आंदोलकांना खडेबोल सुनावलेत. समाजाला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य आंदोलकांनी करू नये, असे ते म्हणालेत.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, न्यायालयीन प्रक्रियेमुळे या प्रकरणी काहीसा वेळ लागत आहे. पण सरकारने घेतलेला निर्णय कोर्टात टिकला पाहिजे, यासाठी आमच्याकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत. मराठा समाजाने यापूर्वीही अनेकदा मोर्चे काढले. त्याची देशभर चर्चा झाली. पण कुठेही गालबोट लागले नाही. कारण, असे काही झाले तर त्याने समाजाची बदनामी होते. आता जी काही मंडळी काही प्रकार करत आहेत ते चुकीचे आहे. या प्रकरणी रस्ते अडवणे किंवा रिझर्व्ह बँकेपुढे जाऊन घोषणाबाजी केल्याने आरक्षण मिळत नाही. कोणताही प्रश्न सुटत नाही.
मनोज जरांगे स्वतः आझाद मैदानावर बसलेत. त्यामुळे सर्व मराठा बांधवांनीही आझाद मैदानावर गेले पाहिजे. त्या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला पाहिजे. आपण मुंबईला कशासाठी आलो हे लक्षात घेतले पाहिजे. सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल होता कामा नये. आपलीही बदनामी होता कामा नये.
ते पुढे म्हणाले, मराठा बांधव आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मैदानात येत असतील तर त्यात काहीच गैर नाही. पण त्याशिवाय इतरत्र जाऊन दैनंदिन जीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर त्यामुळे समाजाची बदनामी होते याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी या प्रकरणी मराठा आंदोलकांवर टीका करण्याची काहीही गरज नसल्याचेही स्पष्ट केले. आंदोलनकर्त्यांमुळे मुंबईतील रहदारीवर काहीसा परिणाम झाला. पण त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याचे कोणतेही कारण नाही, असे ते म्हणाले.
दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आज बैठकांचे सत्र सुरू आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. सोबतच मंत्री छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे-पाटील आणि महाधिवक्त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होत आहे. यात काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

