मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तिखट टीका केली होती. ते कुचक्या कानाचे असल्याचे ते म्हणाले होते. पण आता राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी एका निवेदनाद्वारे मनसैनिकांना राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांच्या पोटापाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत आलेले मराठा बांधव आपलेच आहेत. त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत त्यांच्या पोटाची चिंता दिसू नये ही आपली जबाबदारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गत 4 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. त्यांच्या पोटापाण्यासाठी राज्यभरातून अन्नाची रसद पाठवली जात आहे. पण त्यानंतरही मुंबईत काहीही कमी पडू नये यासाठी मनसे नेते अमित ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मराठा आंदोलकांना अन्नपाणी पुरवण्याच्या सूचना केल्या आहेत.
अमित ठाकरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत. हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत… म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत.
ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करीत आहेत. त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई-वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे.
माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे,
जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी पुरवा.
औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका.
त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या.
एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटा आहे.
लक्षात ठेवा, ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली, तरी ते आपली जबाबदारी आहेत, आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल. आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील, ही मला खात्री आहे, असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे हे पुन्हा मुंबईत का आले? या प्रश्नाचे उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतात, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर मनोज जरांगेंनी त्यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली होती. ते म्हणाले होते, राज्यातील समाजाचे म्हणणे आहे की, हे दोन्ही भाऊ चांगले आहेत. ब्रँड चांगला आहे. पण हा विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नात पडतो. त्याला आम्ही कधी विचारले का की, 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले? त्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात केव्हा आला? आम्ही तुला विचारले का तू काल पुण्यात केव्हा आला?तुला विचारले का तुझी नाशिकची सासरवाडी आहे, तू 50 वेळा नाशिकला का येतो? आम्ही विचारले का? देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेला तुझा गेम केला. त्यानंतर विधानसभेला तुझा पोरगा त्यांनी पाडला. त्यानंतरही तू त्यांची री ओढतो. राज ठाकरे कुचक्या कानाचा आहे. त्याच्या घरी फडणवीस चहा पिऊन गेला, सगळा पक्ष बरबाद झाला तरी त्याला चालते. आमच्या खेड्यात याला कुचक्या कानाचे म्हणतात, असे ते म्हणाले होते.
राज ठाकरे शनिवारी पुण्यात आले होते. तेव्हा त्यांनी मराठा आंदोलनावर भाष्य केले होते. ते म्हणाले होते, मराठा मोर्चा व आरक्षणाच्या मुद्यावर सर्व गोष्टींची उत्तरे एकनाथ शिंदेच देऊ शकतात. मनोज जरांगे परत का आले? याचेही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा. जेव्हा एकनाथ शिंदे येतील तेव्हा त्यांना विचारा मुंबईकरांना खूप त्रास होतोय, एकनाथ शिंदे मागच्यावेळी नवी मुंबईत गेले होते, त्यावेळी त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आले? या प्रश्नांची सगळी उत्तरे एकनाथ शिंदे देतील.

