भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय स्कूल ऑफ परफाॅर्मिंग आर्ट्स पुणे च्या वतीने पुणे फेस्टिवल मध्ये आविष्कार भारती कार्यक्रमाचे सादरीकरण
पुणे ः भक्तिरसाने नटलेले अभंग, ठुमरीच्या माधुर्यात गुंफलेली शब्दांची आणि संगीताची सुरेल मेजवानी, तर गझलेतील कोमल शृंगाराचा सुरेल आविष्कार…रसिकांना भुरळ घालणारे नाट्यसंगीत आणि यासोबतच भरतनाट्यम, कथक आणि सत्रिय नृत्याच्या मोहक सादरीकरणाने पुणेकर मंत्रमुग्ध झाले. नृत्य व संगीताच्या या अद्वितीय कलाविष्कारातून रसिकांनी एक आगळावेगळा कलोत्सव अनुभवला. कार्यक्रमाचे संयोजन आणि मार्गदर्शन ऑफ परफाॅर्मिंग आर्ट्स चे संचालक प्रा. शारंगधर साठे यांचे होते.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय स्कूल ऑफ परफाॅर्मिंग आर्ट पुणे आयोजित आविष्कार भारती या कार्यक्रमाचे सादरीकरण बालगंधर्व येथे सुरू असलेल्या ३७ व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये झाले. यावेळी स्कूल ऑफ परफाॅर्मिंग आर्टचे विद्यार्थी श्रृती विश्वकर्मा -मराठे, भाग्येश मराठे, नागेश आडगावकर यांनी गीतांचे सादरीकरण केले. तर स्कूल ऑफ परफाॅर्मिंग आर्ट मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थींनी नृत्याचे सादरीकरण केले. यावेळी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अभय छाजेड , मोहन टिल्लू, डॉ प्रवीण कासलीकर, डॉ. देविका बोरठाकूर हे उपस्थित होते. विनायक कुडाळकर, ऋषिकेश जगताप (तबला), स्वानंद कुलकर्णी (हार्मोनियम), स्वप्निल सूर्यवंशी (पखवाज), ओंकार ओजागरे (कीबोर्ड ) यांनी साथसंगत केली.
‘गणपत विघ्न हरण गजानन’ या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर मंदारमाला या नाटकातील ‘सोऽहम हर डमरू बाजे’ ही तोडी रागावर आधारित बंदिशीने रसिकांना पुन्हा भुरळ पाडली. ‘ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया’, ‘आओगे जब तुम ओ सजना’ या गझलेला रसिकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाचा मध्यांतर ‘युवती मना’ या गीताने झाला. त्यानंतर कथक, भरतनाट्यम, मोहिनीहट्टमआणि सत्रिय नृत्याच्या सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्काराने कार्यक्रमाचे शिखर गाठले.

