मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदानात दाखल झाल्या. त्यांनी आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी जात जरांगेंची विचारपूस केली. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवत आहे. यामुळे मनोज जरांगे उपोषणस्थळी झोपलेले होते. सुप्रिया सुळे यांनी यावेळी मंचावर असलेल्या मराठा समान्वयकांशी चर्चा केली. तसेच अंतरवलीच्या सरपंचांनी मनोज जरांगे यांना उठवलं. यावेळी मनोज जरांगे बोलण्याच्या अवस्थेत नव्हते. सुप्रिया सुळे मनोज जरांगे यांना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन केले .
त्यानंतर सुप्रिया सुळे मंचावरुन खाली उतरल्यावर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या चार दिवसांपासून काहीही खाल्ले नसल्याने खूप जास्त वीकनेस आला आहे. मी त्यांना म्हणाले की उठू नका आणि तब्येतीची काळजी घ्या. तसेच येथे स्वच्छतेचा मोठा प्रॉब्लेम येत असल्याची तक्रार जरांगे यांनी केली आहे. त्यामुळे येथील बीएमसीला सांगून येथील स्वच्छतेचे काम करण्यात यावे. त्यानुसार मी आयुक्तांना बोलणार आहे, अशी माहिती सुळे यांनी दिली आहे.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात यावी. तसेच पाहिजे असेल तर लगेच एक दिवसाचे अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्गी लावा. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला कोणाचाच विरोध नाही, मग मुख्यमंत्र्यांना काय अडचण आहे? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्याचे वाक्य होते आमचे सरकार आल्यावर मराठा समाजाला आरक्षण देऊ, आता काय झाले. एवढे मोठे बहुमत दिले आहे महायुतीला तर देऊन टाकायला पाहिजे आरक्षण. लोकशाही आहे आणि आम्ही हुकुमशाही होऊ देणार नाही. चर्चेला आम्ही सगळे तयार आहोत. सगळ्यांना बोलवा आणि मार्ग काढावा. ११ वर्षे झाले सत्ता आहे तर मराठा आरक्षण देऊन दाखवावे, असे आव्हान देखील सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
यानंतर ते परतीला जात असताना त्यांच्या गाडीजवळ आंदोलकांनी त्यांना घेराव घातला. आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांनी यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. “शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं”, अशी घोषणाबाजी आंदोलकांनी यावेळी केली. यावेळी आंदोलक प्रचंड आक्रमक झालेले बघायला मिळाले. या भर गर्दीत काही आंदोलकांनी सु्प्रिया सुळे यांना गाडीत बसण्यासाठी प्रयत्न केले. इतर आंदोलकांनी आक्रमक आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण आक्रमक आंदोलन ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.आंदोलकांचा इतका मोठा रोष असताना सुप्रिया सुळे यांनी संयम ढळू दिला नाही. त्या चारही बाजूने आंदोलकांना हात जोडून नमस्कार करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा राग नव्हता. त्या स्मितहास्य करुन आंदोलकांना नमस्कार करताना दिसत होत्या. यावेळी काही आंदोलकांनी त्यांना सुखरुप गाडीत बसवलं. पण गाडीत बसवल्यानंतर काही आंदोलक आणखी आक्रमक झाले. त्यांनी चारही बाजूने गाडीला घेरलं. ते जोरदार घोषणाबाजी करत राहिले

