मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठा-ओबीसी, हिंदू-मुस्लिम वाद वाढला पाहिजे ही भाजपची भूमिका आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.राज राजापूरकर म्हणाले की, तुम्ही गांधींना मारले, तुकारामांना मारले, आता तुम्हाला जरांगे यांना मारायचे आहे का? असा सवाल करत त्यांनी आंदोलनाला अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हटले की, “मुख्यमंत्र्यांनी सर्वांचा मुख्यमंत्री व्हावे, फक्त भाजपचा नाही. समाजात दंगली घडवण्याचे काम आता व्हायला नको.
जरांगेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेतल्यानंतर राजापूरकरांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी देशाचा नागरिक आहे. म्हणून मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपुस करायला, भेटायला गेलो होतो, मात्र याचा चुकीचा अर्थ घेत ओबीसी मराठ्यांच्या भेटीला, असे वाद लावले जात आहेत. भाजपला हेच पाहिजे आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. सरकारने यावर निर्णय घ्यायचा आहे. मुख्यमंत्र्यांनी हातात बांगड्या तर भरल्या नाहीत ना? असा खोचक सवाल राजापूरकर यांनी केला आहे. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार नाराज झाल्यावर ते मोदींकडे जातात, मग आता मराठा समाज नाराज असताना त्यांची अडचण का सोडवत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तुम्ही गांधींना मारलं, आता जरांगेना मारणार आहात का? काय चाललय महाराष्ट्रात? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी केला आहे.

