पंढरपूर -मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केले असताना, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण देणे शक्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच, त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेवरही जोरदार टीका केली आहे.चंद्रकांत पाटील म्हणाले की, आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिली असतानाही सामान्य मुंबईकरांना वेठीस धरणे चुकीचे आहे. हे आंदोलन राजकीय असून, येणाऱ्या पंचायत राज निवडणुकीत ओबीसी आरक्षण घेऊन त्याचा राजकीय वापर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस कधीही खोटे बोलत नाहीत, पण काही लोक नेहमीच ‘खोटं बोल पण रेटून बोल’ असे करतात
चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठे हे सामाजिक मागास नाहीत. मराठ्यांना दलितांसारखी अस्पृश्यतेची वागणूक मिळालेली नाही, असे ते म्हणाले. त्यांनी EWS आरक्षणालाच मराठा समाजाचे खरे आरक्षण म्हटले. एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार केवळ मागासवर्गीय आयोगाला आहे, तो शिंदे समितीला नाही, असे स्पष्ट करत त्यांनी आंदोलनाच्या कायदेशीर बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, कायदेशीरदृष्ट्या ज्याचा दाखला नाही अशा मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसी मधून आरक्षण मिळणे अशक्य आहे. आता वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या मान्य केल्या तरी त्या कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या नसतील.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, पितृसत्ताक पद्धतीनुसार सगेसोयरे हे फक्त वडिलांकडचेच मानले जातात, आणि आता लाखो मराठा बांधवांना कुणबी दाखल्याचा लाभ होत आहे. त्यांनी शरद पवार यांच्या तामिळनाडूच्या उदाहरणावरही टीका केली. तामिळनाडूचे आरक्षण अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि ते टिकणारे नाही, असे पाटील म्हणाले.

