- नाचू किती नाचू किती कंबर लचकली (सुगंधी कट्टा)
- बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला (सांगत्ये ऐका)
- पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा (मल्हारी मार्तंड)
- सोळावं वरीस धोक्याचं (सवाल माझा ऐका)
- कसं काय पाटील बरं हाय का (सवाल माझा ऐका)
- ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे (साधी माणसं)
- बाई मी पतंग उडवीत होते (लाखात अशी देखणी)
- कशी गवळण राधा बावरली (एक गाव बारा भानगडी)
- कशानं आज माझ्या डोळ्यात लाज आली (काय हो चमत्कार)
- पप्पा सांगा कुणाचे (घरकुल)
हि अशी लोकप्रिय आणि ज्यांच्यावर चित्रित झाली त्या अभिनेत्री जयश्री गडकर यांचा आज स्मृतिदिन … आजच्या पिढीला त्यांची गाणी ठाऊक असतीलच पण त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याबद्दलची माहिती नवरसिकांनी जाणून घ्यावी यासाठी हि माहिती
जयश्री गडकर : (21 फेब्रुवारी 1942 – 29 ऑगस्ट 2008).

प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ कार्यरत असणाऱ्या अभिनेत्री, निर्मात्या आणि दिग्दर्शिका. त्यांचा जन्म कर्नाटकातील कणसगिरी (ता. सदाशिवगड, जि. कारवार आताचा जि. उत्तर कन्नड) या लहानशा खेडेगावात झाला. लहानपणीच त्या मुंबईला आल्या. खेतवाडीतील महानगरपालिकेच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. गिरगावच्या राममोहन हायस्कूलमधून त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. त्यांना लहानपणापासून नृत्याची आणि गाण्याची आवड होती. त्यांनी मास्टर नवरंग यांच्याकडे दहा वर्षे गाण्याची तालीम घेतली. त्यांनी कथ्थक नृत्याचे प्रशिक्षणही घेतले होते. हौशी रंगभूमीवरही त्यांनी काम केले. जयश्री यांचा रुपेरी पडद्यावरचा प्रवेश बाल कलाकार म्हणून झाला.निर्माते-दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ (1955) या गाजलेल्या चित्रपटातील नायिका संध्या यांच्याबरोबरच्या एका समूहनृत्यात भाग घेण्याची संधी जयश्रीबाईंना मिळाली. रशियाचे नेते न्यिकित ख्रुश्चॉव्ह हे भारत भेटीवर आले असताना त्यांच्यासाठी पुण्यात सादर केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ‘लटपट लटपट तुझं चालणं’ या गाण्यावर नृत्य केले. त्याची छायाचित्रे दिग्दर्शक दिनकर पाटील यांनी पाहिली आणि त्यांच्या ‘दिसतं तसं नसतं’ (1956) या चित्रपटात त्यांनी जयश्रीबाईंना नृत्याची संधी दिली. हा त्यांचा खऱ्या अर्थाने पदार्पणाचा चित्रपट मानता येईल. प्रसिद्ध चित्रपटकर्मी भालजी पेंढारकर यांची निर्मिती असणाऱ्या, राजा परांजपे दिग्दर्शित ‘गाठ पडली ठकाठका’ (1956) या चित्रपटात जयश्रीबाईंना पहिल्यांदा नायिका म्हणून संधी मिळाली. या चित्रपटात बाबूराव पेंढारकर, राजा गोसावी, सूर्यकांत, रमेश देव, गणपत पाटील अशा दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी काम केले.
यानंतर राजा गोसावींबरोबर त्यांनी ‘आलीया भोगासी’ (1957) हा चित्रपट केला. त्यांना पुढे ‘सांगत्ये ऐका’ (1959) या तमाशाप्रधान चित्रपटात साहाय्यक अभिनेत्रीची भूमिका मिळाली. या चित्रपटामध्ये हंसा वाडकर, चंद्रकांत, सूर्यकांत, रत्नमाला आणि वसंतराव पेहेलवान अशा आघाडीच्या कलाकारांबरोबर काम करताना जयश्रीबाईंच्या अभिनयाचा कस लागला आणि व्यक्तिरेखा दुय्यम असूनही त्यातल्या त्यांच्या कामगिरीमुळे त्यांचे नाव एकदम प्रकाशझोतात आले. हा चित्रपट खूप गाजला. पुण्याच्या विजयानंद चित्रपटगृहात 132 आठवडे चालून त्याने विक्रम केला. त्यातील ‘बुगडी माझी सांडली गं’ हे गाणे विशेष गाजले. हे गीत त्यातल्या जयश्रीबाईंच्या नृत्यचापल्य आणि अभिनयामुळे इतकी वर्षे उलटूनही रसिकांच्या स्मरणात आहे. त्यानंतरच्या त्यांच्या ‘सवाल माझा ऐका’ (1961) व ‘मल्हारी मार्तंड’ (1965) ह्या तमाशाप्रधान चित्रपटांना खूप प्रसिद्धी मिळाली. तसेच त्यांतील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले. या दोन चित्रपटांतील ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘कसं काय पाटील बरं हाय का’, ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’ ही लावणी नृत्ये खूप गाजली.
जयश्रीबाईंवरचा तमाशाप्रधान चित्रपटाची नायिका हा शिक्का पुसून टाकून कारकीर्दीला नवे वळण देणाऱ्या अनंत माने दिग्दर्शित “मानिनी” (1961) या कौटुंबिक चित्रपटात त्यांनी प्रसिद्ध अभिनेते चंद्रकांत गोखले यांच्या नायिकेचे काम केले. गरीब पण स्वाभिमानी अशा मालतीची भूमिका त्यांनी त्यात यशस्वीपणे साकारली. या चित्रपटातील ‘खोप्यामधी खोपा’, ‘अरे संसार संसार’, ‘मन वढाय वढाय’ ही गाणी खूप गाजली. “मोहित्यांची मंजुळा” (1963) या ऐतिहासिक चित्रपटात त्यांनी पुरुष वेष धारण करून स्वराज्याच्या रक्षणार्थ लढाईत उतरलेली मराठमोळी वीरांगना साकार केली. साधी माणसं हा त्यांचा गाजलेला एक सामाजिक चित्रपट. यात त्यांनी व्यवसायाने लोहाराचे काम करणाऱ्या, सामान्य वाटणाऱ्या पण मनाने खंबीर अशा स्त्रीची भूमिका केली. फसवणूक झालेल्या पतीच्या मागे त्याच्याशी एकनिष्ठ राहून अनेक संकटांना सामोरे जाताना तिची झालेली ससेहोलपट जयश्रीबाईंनी या चित्रपटात परिणामकारतेने रंगवली. या चित्रपटाला लता मंगेशकर यांनी ‘आनंदघन’ या नावाने संगीत दिले होते. ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘वाट पाहुनी जीव शिणला’, ‘माळ्याच्या मळ्यामंदी’, ‘राजाच्या रंगम्हाली सोन्याचा बाई पलंग’, ‘नको देवराया अंत आता पाहू’ इत्यादी या चित्रपटातील गाणी आणि जयश्रीबाईंचा अभिनय इत्यादींमुळे हा चित्रपट यशस्वी झाला.
जयश्रीबाईंनी अवघाची संसार (1960), कलंक शोभा (1961), पवनाकाठचा धोंडी (1966), घरगंगेच्या काठी (1975) इत्यादी सामाजिक चित्रपटांत; याला जीवन ऐसे नाव (1959), पैशाचा पाऊस (1960) इत्यादी विनोदी चित्रपटांत; उतावळा नारद (1957), सुभद्राहरण (1963), गोपाळ कृष्ण (1965), तुलसी विवाह (1971) इत्यादी पौराणिक चित्रपटांत यशस्वी भूमिका वठवल्या. त्यांनी जे मोजके हिंदी चित्रपट केले त्यांत प्रायव्हेट सेक्रेटरी (1962), मदारी (1959), सारंगा (1961), बहारों के सपने (1967), तुलसी विवाह (1971), बजरंग बली (1976) इत्यादी गाजलेल्या पौराणिक आणि संतपटांचा समावेश आहे.
जयश्रीबाईंनी तमाशाप्रधान चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली, त्यामुळे अशाप्रकारच्या भूमिका त्यांच्या वाट्याला अधिक प्रमाणात आल्या. त्यातील दिलखेचक नृत्याभिनयाने त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. याबरोबरच त्यांनी कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक अशा अडीचशेहून अधिक मराठी चित्रपटांतून वेगवेगळ्या धाटणीतल्या विविध व्यक्तिरेखा साकारल्या. यामुळे अष्टपैलू अभिनेत्री म्हणून त्या नावारूपास आल्या. मराठी चित्रपटाच्या सुरुवातीच्या कालखंडातील बहुतांशी दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले. त्यांमध्ये भालजी पेंढारकर, राजा परांजपे, दिनकर पाटील, दत्ता माने, अनंत माने, राजा ठाकूर इत्यादी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शकांचा समावेश होतो. अभिजात सौंदर्य, नृत्यकौशल्य, कसलेला अभिनय यांच्या जोडीला चिकाटी आणि परिश्रम करण्याची क्षमता यांमुळे त्या मराठी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ चमकत राहिल्या. मराठी आणि हिंदी चित्रपटांशिवाय गुजराती, भोजपुरी, पंजाबी आणि तमिळ चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या.
मराठी चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्यांसोबत जयश्रीबाईंनी केलेले काम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. सांगत्ये ऐका या चित्रपटापासून जयश्रीबाई आणि अभिनेते सूर्यकांत यांची जमलेली जोडी पुढे लग्नाला जातो मी, पंचारती (1960), वैजयंता, रंगपंचमी (1961), मल्हारी मार्तंड, साधी माणसं, पाटलाची सून (1965), लाखात अशी देखणी (1971) अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकली. अभिनेते अरुण सरनाईक यांच्याबरोबरच्या सवाल माझा ऐका , एक गाव बारा भानगडी (1968), घरकुल (1971), गणगौळण (1969) इत्यादी चित्रपटांतून ही जोडी रुपेरी पडद्यावर गाजली.
1975 साली जयश्रीबाई मराठी नाटक आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेते बाळ धुरी यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. विवाहानंतर जयश्रीबाईंनी त्यांच्यासोबत अशी असावी सासू (1996), हे दान कुंकवाचे (1983), मुंबई ते मॉरिशस (1991) इत्यादी चित्रपटांत काम केले. या दांपत्याला आनंद हे सुपुत्र आहेत. बाळ धुरी आणि आनंद धुरी यांनी ललितकलेला प्रोत्साहन देण्याकरता ‘जयश्री गडकर प्रतिष्ठाना’ची स्थापन केली आहे.
विवाहानंतरही जयश्रीबाईंची रुपेरी पडद्यावरची घोडदौड पुढे सुरू राहिली. दिग्दर्शक दत्ता केशव यांच्या “जिद्द” (1980) या चित्रपटापासून त्या चरित्र भूमिकेकडे वळल्या. निर्माते-दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या “रामायण” (1986) या दूरचित्रवाणी मालिकेत त्यांनी कौसल्या, तर त्यांचे पती बाळ धुरी यांनी दशरथाची भूमिका साकारली. या भूमिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतून चरित्र भूमिका केल्या. त्यांनी ‘सासर माहेर’ (1994), अशी असावी सासू (1996) या मराठी चित्रपटांची निर्मिती, लेखन व दिग्दर्शन केले. शिवाय त्यांत प्रमुख भूमिकाही केली.
जयश्रीबाईंना अनेक मानसन्मानांनी गौरवण्यात आले. मानिनी, वैजयंता, सवाल माझा ऐका, साधी माणसं, पवनाकाठचा धोंडी या चित्रपटांसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्री या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. साधी माणसं, पाटलाची सून, थांब लक्ष्मी कुंकू लावते आणि घरगंगेच्या काठी या चित्रपटांसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचे राज्य पुरस्कार प्राप्त झाले. घरकुलसाठी विशेष अभिनेत्री राज्य पुरस्कार त्यांना देण्यात आला. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील यशस्वी कारकीर्दीकरता त्यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, ग. दि. माडगूळकर आणि जनकवी पी.सावळाराम पुरस्कार यांनी गौरवण्यात आले. त्यांचे “अशी मी जयश्री” हे आत्मचरित्र 1986 साली प्रसिद्ध झाले. यामध्ये त्यांनी आपल्या चित्रपटातील कारकीर्दीचा वेध घेतला आहे. त्यांचे पती बाळ धुरी यांनी “सुवर्ण नायिका जयश्री गडकर – नक्षत्रलेणं” हे पुस्तक प्रकाशित करून त्यात आपल्या अभिनेत्री-पत्नीच्या पन्नास वर्षांच्या चित्रपटीय कारकीर्दीचा सर्वंकष पण साक्षेपाने आढावा घेतला आहे.
तब्बल पाच दशके मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या चतुरस्त्र कामगिरीमुळे अढळपद मिळवणाऱ्या या गुणी अभिनेत्रीचे वयाच्या 66 व्या वर्षी हृदयविकाराने मुंबईत निधन झाले.
अभिनेत्री जयश्री गडकर यांना मिळालेले पुरस्कार –
■ 1959 : ‘सांगत्ये ऐका’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रसरंग फाळके पुरस्कार
■ 1962 : ‘मानिनी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राज्य सरकारकडून पुरस्कार (maharashtra state award)
■ 1963 : ‘साधी माणसं’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राज्य सरकारचा पुरस्कार
■ 1964 : ‘सवाल माझा ऐका’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राज्य सरकारचा पुरस्कार
■ 1965 : ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राज्य सरकारचा पुरस्कार
■ 1971 : ‘घरकुल’ चित्रपटासाठी special appearance साठी राज्य सरकारचा पुरस्कार
■ 1976 : ‘घर गंगेच्या काठी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राज्य सरकारचा पुरस्कार
मराठी चित्रपटसृष्टीतल्या या चौफेर प्रदीर्घ कारकिर्दीची दखल घेऊन 30 एप्रिल 2003 रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘व्ही. शांताराम पुरस्कार’ दिला. त्यापूर्वीही 1998 साली ‘गदिमा पुरस्कार’, 2001 मध्ये ‘झी अल्फा गौरव पुरस्कार’, 2003 मद्धे ‘झी चित्र गौरव पुरस्कार’, 2004 साली जनकवी पी. सावळाराम स्मरणार्थ ‘गंगाजमुना पुरस्कार’, 2005 मध्ये ‘समाजदर्पण’, सिने अँड टीव्ही आर्टिस्टतर्फे दिला जाणारा ‘सीण्टा’ पुरस्कार,यासह अनेक महत्त्वाचे पुरस्कार, सन्मान त्यांना लाभले.

