सेवा मित्र मंडळाच्या वतीने पाच ज्येष्ठ भागवत भक्तांचा सन्मान व धान्य तुला
पुणे : गणेशोत्सव किंवा वारी असो याचे जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. त्याला वेगळा इतिहास आहे आणि हेच खरे ज्ञान आहे. आपले ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हा सणांचा उद्देश असून धार्मिक उत्सवासोबत सामाजिक सेवा हे गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे, असे मत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केले.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५०व्या जयंती निमित्त मंडळाने यावर्षी जिवंत देखावा सादर केलेला आहे. त्यानिमित्त पाच जेष्ठ भागवत भक्तांचा सन्मान व धान्य तुला करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, मंडळाचे अध्यक्ष नितीन होले, शिरीष मोहिते, रोहन जाधव, अँड हेमंत झंजाड, दिलीप काळोखे, विक्रांत मोहिते, अमर लांडे, सचिन ससाणे, नमन कांबळे, स्वामी महाले, राजाभाऊ महाडिक, अनुप थोपटे आदी उपस्थित होते.ज्येष्ठ टाळ वादक माऊली टाकळकर, ह.भ.प. वत्सलाताई शिर्के, ह.भ.प. डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर, मृदंगाचार्य पांडुरंग तथा आप्पासाहेब दातार, आळंदी देवस्थान विश्वस्त अँड राजेंद्र उमाप यांची धान्यातुला व सन्मान करण्यात आला. धान्यतुलेतील धान्य ५ उपेक्षित घटकातील संस्थांना देण्यात आले.
जितेंद्र डुडी म्हणाले, यंदा गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला असून यंदाचा उत्सव हा वेगळा आहे. हा केवळ देशातीलच नव्हे तर जगातील मोठा धार्मिक उत्सव असून याची ख्याती सर्वत्र पोहोचायला हवी. उत्सवांचा आपला इतिहास हा पुढील पिढीला सांगणे आवश्यक असून त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवायला हवे.
ह.भ.प. डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर म्हणाले, त्याग, समर्पण, चारित्र्य आणि ज्ञान यावर समाजासाठी आपले जीवन समर्पण करण्याचे काम प्रत्येकाने करायला हवे. आनंद निर्मिती करून जगाला आनंदी करण्याचा प्रयत्न करायला हवा. ज्ञानोबा – तुकोबा हे महाराष्ट्राचे श्वास आहेत, असेही त्यांनी सांगितले. शिरीष मोहिते यांनी प्रास्ताविक केले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले.

