मुंबई-‘मुंबईचा राजा’ अशी ओळख असलेल्या लालबागचा राजाच्या चरणी गणेशोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांतच भाविकांनी भरभरून दान केले आहे. मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाप्पाच्या दानपेटीत अवघ्या दोन दिवसांत १ कोटी १९ लाखांहून अधिक रोख रक्कम जमा झाली आहे. यासोबतच सोन्या-चांदीचे दागिनेही मोठ्या प्रमाणात अर्पण करण्यात आले आहेत.
शुक्रवारी एकाच दिवसात ७३.१० लाख रुपयांचे विक्रमी दान जमा झाले. यामध्ये स्टेजसमोरील दानपेटीत ३८.१० लाख रुपये, तर दर्शनाच्या रांगेतील दानपेटीत ३५ लाख रुपये मिळाले. रोख रकमेव्यतिरिक्त भाविकांनी २२५.८०० ग्रॅम सोने आणि ७,६५९ ग्रॅम चांदीचे दागिनेही दान केले. यापूर्वी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंडळाला ४६ लाख रुपयांचे दान मिळाले होते. त्यात स्टेजसमोरील पेटीतून २५.५० लाख रुपये आणि रांगेतील पेटीतून २०.५० लाख रुपये जमा झाले होते. पहिल्या दिवशीही १४४.०५० ग्रॅम सोने आणि ७,१५९ ग्रॅम चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले होते. या दोन दिवसांतील एकूण दानाची बेरीज पाहता बाप्पाच्या चरणी १ कोटी १९ लाख रुपयांची रोख रक्कम, सुमारे ३६९.८५० ग्रॅम सोने आणि १४,८१८ ग्रॅम चांदी जमा झाली.

