एकाचे काढून दुसऱ्याला आम्ही मागतच नाही-मराठ्यांच्या पोरांशी वाईट वागू नका–खूप मोठ्या संख्येने मराठे मुंबईत येणार आहेत-आता फायनल फाईट होणार
मुंबई-मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत आंदोलन सुरू असून आणखी एक दिवसाची परवानगी देण्यात आली आहे. राज्यभरातून लाखो मराठे मुंबईत दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला आज सायंकाळी ६ पर्यंतची वेळ होती. परंतु आणखी एक दिवसाची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना तूफान फटकेबाजी केली.
मनोज जरांगे म्हणाले, इंग्रजांपेक्षा हे सरकार बेकार. सरकारने भंगार खेळ खेळणे बंद करा, असली खेळ खेळा. सरकारने जेवण आणि पाणी मिळू दिले नाही. सरकार आडमुठे गेले तर मराठे आडमुठे घुसणार. एक एक दिवसाची रडक्यासारखी परवानगी दिली. तुम्ही आमच्या जिल्ह्यात आल्यावर अशी वागणूक देतो का? तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक दिली न फडणवीस साहेब तर आमच्याकडे आल्यावर आम्ही पण तुम्हाला त्रास देणार. कशाला त्या लफड्यात पडता?
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, तुमचे खरे आणि आमचे खरे नाही, असे कसे होऊ शकते? आमचे मराठ्याचे पोरं चावतेत का रस्त्याने चालताना? तुमच्या दारात आलो तर एक एक दिवसाची परवानगी देता, काय राव? २७ तारखेला सकाळी पण जेवलो नाही, तसाच पुढे निघालो. २८ ला सकाळी जेवलो ते पण थोडेच जेवलो आणि त्यात मी जागाच होतो. मला हे सरकारला सांगायचे आहे की मराठ्यांच्या पोरांशी वाईट वागू नका, गरिबाचे लेकरे आहेत ते. आमचे लोक माज घेऊन नाही आले इकडे. आमच्या पोरांचे खूप हाल आहेत, तुम्हाला नाही कळणार मुख्यमंत्री साहेब. तुम्हाला आमचे वेदना कळत नाही.
मी बलिदान द्यायला तयारच झालो आहे, पण तुम्ही आमच्या मराठ्यांच्या पोरांसाठी दुकाने बंद करू नका. नाहीतर जशास तसे होणार. पोरांनो तुम्ही कुठेही गेले तरी संयम पाळा. आपापल्या गाड्या व्यवस्थित मैदानावर जाऊन लावा. तिथून इथे मैदानात येता येईल. चेंबूरच्या मैदानावर गाड्या लावा. पार्किंगची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने नाही ऐकले तर आणखी खूप मोठ्या संख्येने मराठे मुंबईत येणार आहेत. मी खोटे सांगत नाही. तुम्ही जेवढा विलंब कराल तेवढे मराठे मुंबईमध्ये येत राहणार. आम्ही लोकशाहीचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी त्याला तयार आहे, तुम्ही जे कराल त्यासाठी मी तयार आहे. माझ्या मागण्या तुम्हाला माहीत आहे, आता पुन्हा सांगणार नाही.
मनोज जरांगे पाटील पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर देताना म्हणाले, या सरकारला मराठ्यांच्या पोरांचे भले होऊ द्यायचे नाही. त्यांना मराठा समाजाचे वाटोळे करायचे आहे म्हणून कोणी चर्चेला आले नाही. एक दिवसाची परवानगी देऊ शकतात तर कायमस्वरूपी परवानगी सरकार देऊ शकते. सरकार असून खूप चुकीचे करत आहेत. त्यांनी गैरसमज पसरवण्याचे काम केले आहे. एकाचे काढून दुसऱ्याला आम्ही मागतच नाही, हे सरकारचे काम आहे. आमच्या जुन्या नोंदी आहेत.
ओबीसी १६ टक्के आरक्षण खातात. ओबीसीला ३२ टक्के त्यातले २० टक्के कमी करा आणि आम्हाला द्या असे आम्ही म्हणालो का? आमच्या नोंदी आहेत त्यातले आरक्षण मागत आहोत. आता महाराष्ट्राला सगळे कळले आहे. आपल्या सरकारी नोंदी आहेत, आपण कोणाचे घेत नाही. हे ओबीसी लोकांना पण माहीत आहे, काही लोक सोडले तर. आता फायनल फाईट होणार. आरक्षण होणार नाहीतर मी तरी उपोषण करून मरणार. त्यांच्या आडमुठेपणामुळे केंद्र सरकारलाही दाग लागणार आहे, असेही जरांगे म्हणाले.
आंदोलनाची तीव्रता कमी होऊ शकत नाही. मराठ्यांना माहीत आहे की मी त्यांच्यासाठी लढतोय. मराठे त्यांच्यावर विश्वास ठेऊ शकत नाही. आता मराठे ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यांना फसवण्यात आले आहे. आम्ही खंबीर आहोत. उंटावर बसून काडीने औषध देण्याचे काम सरकार करत आहे.

