उत्सवाचे १३२ वे वर्ष ; हलत्या झोपाळ्यावर शारदा गणपती
पुणे : अखिल मंडई मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात ‘कृष्णकुंज’ ही आकर्षक सजावट साकारण्यात आली आहे. यावर्षी हलत्या झोपाळ्यावर शारदा गणपती विराजमान झाले आहेत. सजावटीतील श्री राधाकृष्णाच्या हस्तचित्रित मनमोहक कलाकृती गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत.
अखिल मंडई मंडळाचे उत्सवाचे यंदा १३२ वे वर्ष आहे. हिरव्यागार जंगलाच्या सान्निध्यात ‘कृष्णकुंज’ ही भव्य सजावट मंडळातर्फे साकारण्यात आली आहे. तब्बल ९० फूट बाय ६० फूट आकारात राजस्थानी शैलीतील ही सजावट असून प्रवेशद्वारावर झोपाळ्यावरील राधा-कृष्ण मूर्ती आहे. महिरप आणि मोरांच्या कलाकृती, कलमकारी शैलीतील श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित मोठी चित्रे भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. याशिवाय ५ ते ६ मोठी झुंबरे सजावटीच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
अण्णा थोरात म्हणाले, दर तीन वर्षांनी शारदा गजानन झोपाळ्यावर विराजमान होतात. यावर्षी शारदा गजानन झोपाळ्यावर विराजमान झाले असून तो झोपाळा राजस्थानी शैलीने तसेच फुलांनी सजवण्यात आला आहे. या सजावटीच्या निर्मितीसाठी तब्बल ४० कारागीर महिनाभर काम करत होतें संपूर्ण कलादिग्दर्शन सुप्रसिद्ध विशाल ताजनेकर यांचे आहे. उत्सव काळात मोरया गोसावी यज्ञ मंडपात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कीर्तन, प्रवचन, भजन, आणि सामूहिक आरती यांसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

