भाजप आमदार संजय केनेकरांचा हल्लाबोल
मुंबई-मनोज जरांगे पाटील यांच्याकडे शरद पवार यांचा सुसाइड बॉम्ब म्हणून पाहिले जाते. पवारांनी व्यक्तिगत द्वेषापोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडलेला आहे. तो बुमरँग होणार आहे. पवार समाजाचे नुकसान करत आहे, असा आरोप भाजप आमदार संजय केनेकर यांनी केला आहे. याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील.
संजय केनेकर पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार आपली भूमिका स्पष्ट न करता मनोज जरांगे यांच्यासारखे सुसाइड बॉम्ब महाराष्ट्रात वापरतात हे दुर्दैव आहे. शरद पवार यांनी कुणालाच कायम मुख्यमंत्रिपदी बसू दिलेले नाही, हा त्यांचा इतिहास आहे. देवेंद्र फडणवीस हे विकास करणारे नेतृत्व आहे.संजय केनेकर म्हणाले की, शरद पवारांकडून जातीजमातीमध्ये तणाव पसरवणे, राज्यात आराजकता पसरवण्याचे काम करत आलेले आहे. वसंत-दादापासून तर वसंतराव नाईक यांच्या काळातही त्यांनी महाराष्ट्रात दंगल घडवली. इतिहास काढा शरद पवार नावाचा माणूस माणसांना एकत्र राहू देत नाही. त्यामुळे निश्चितपणे मनोज जरांगे पाटील गाव गाड्यातले मराठे वापरून या वाड्यातील मराठा नेत्याला सुरक्षित ठेवण्याची भूमिका घेऊन हा मोर्चा काढण्यात आला आहे.संजय केनेकर म्हणाले की, हा जातीय आणि व्यक्तिगत द्वेष असून शरद पवारांना हे सातत्याने खुपत असून हा जरांगे नावाचा सुसाइड बॉम्ब शरद पवार यांच्याकडून वापरला जात आहे, असा हल्लाबोल केनेकरांनी केला आहे.
गोळ्या घाला, तुरुंगात डांबा, मागे हटणार नाही – जरांगे
मनोज जरांगे यांनी यावेळी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्वाणीचा इशारा दिला. ते म्हणाले, मायबाप सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बेमुदत उपोषण करण्याची परवानगी द्यावी. आमची तुम्हाला सहकार्य करण्याची तयारी आहे. अन्यथा मंगळवारपासून आणखी कोट्यवधी मराठे मुंबईला येणार आहेत. आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करा. इथे कोट्यवधी लोक घेऊन आलेत. आम्ही मजाक करत नाही. मुख्यमंत्र्यांच्या हातून अजूनही संधी गेली नाही. मराठ्यांचे मन जिंकण्याची संधी तुम्हाला आहे. मराठ्यांची नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका. मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण हवे आहे. तुम्ही त्याच्यात राजकारण करत असाल, तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे इथून हटत नाही. मी याच ठिकाणी मेलो किंवा तुम्ही मला जेलमध्ये नेऊन टाकले, तरी मी जेलमध्ये उपोषण करेन. पण मराठ्यांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही. त्यामुळे सरकारने आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करावी ही आमची विनंती आहे, असे जरांगे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा देताना म्हणाले.

