नवी मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आणि शिवछत्रपती ग्रुपचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रशांत मानसिंग जाधव यांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सदावर्ते मराठा समाजाला सातत्याने लक्ष्य करत असल्याचा आरोप करत, जाधव यांनी त्यांना कठोर शब्दांत इशारा दिला आहे.
नव्या पनवेल उपविभाग प्रमुख असलेल्या जाधव यांनी सदावर्ते यांना उद्देशून म्हटले आहे, “तुमचे कामच समाज फोडणे आणि मराठ्यांच्या हक्कावर कुरघोडी करणे आहे.” मराठा समाज शांत आहे, याला कमजोरी समजू नये, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. “आमच्या आरक्षणावर तोंड चालवले, तर जीभ ओढून काढू,” असे ते म्हणाले. याशिवाय, “समाजाची थट्टा केली तर थोबाड फोडून रस्त्यावर ओढत नेऊ,” अशा धमक्याही जाधव यांनी दिल्या.जाधव यांनी मराठा आरक्षणाची मागणी हा हक्क आहे, उपकार नाही असे ठामपणे सांगितले. या हक्कासाठी लढताना मराठा समाजाची ताकद काय असते, हे महाराष्ट्राने वेळोवेळी पाहिले आहे, असेही त्यांनी नमूद केले. आपल्या निवेदनात जाधव यांनी सदावर्ते यांना थेट आव्हान दिले आहे. “अजून भुंकलात तर मराठा समाजाचा राग तुमचं अस्तित्व मातीमोल करेल,” असा इशारा त्यांनी दिला. मराठा तरुणाई पेटली तर महाराष्ट्र हादरून जाईल आणि सदावर्ते यांचा आवाज कायमचा बंद होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.जाधव यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मराठा आरक्षण आंदोलनाला पुन्हा धार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे, राज्य सरकारवर मराठा आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवण्यासाठी दबाव वाढू शकतो.

