मुंबई -मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो मराठ्यांसह मुंबईत पोहोचलेत. त्यांनी येथील आझाद मैदानावरील आपल्या बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. याठिकाणी खबरदारी म्हणून हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचे तीन – तेरा वाजलेत. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान, मनोज जरांगे व त्यांच्या समर्थकांच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवरील दबाव कैकपटीने वाढला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आज आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबाही दिला.मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते? ते पाहा
मराठा आंदोलनामुळे मुंबईत झालेल्या गर्दीमुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरातील वाहतुकीत मोठे बदल करत आझाद मैदान परिसरातील अनेक रस्त्यांवरील वाहतूक अन्य रस्त्यांवरून वळवली आहे. तर काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत.
कोणते मार्ग बंद राहतील?
वाशीकडून फ्रीवेकडे जाणारा मार्ग. वाशीकडून येणाऱ्या साऊथ बॉण्डने पांचरपोळ-फिवेकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध असल्याचं सांगण्यात आलं आहे. वीर जिजाबाई भोसले मार्गावरून ट्रॉम्बेकडे जाणारा मार्ग. छेडानगरवरून फ्री वेकडे जाणारा मार्ग.
पर्यायी मार्ग कोणते?
वाशीहून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना साऊथ बॉण्डने मानखुर्द टी जंक्शन ब्रीज स्लीप रोडने उजवे वळण घेऊन वीर जिजाबाई भोसले मार्गाने आय ओ सी जंक्शन व छेडानगर मार्गाने मुंबई शहरात प्रवेश करतील. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडने जाणारी वाहने छेडानगर मार्गाने मुंबईत प्रवेश करतील. छेडानगरवरून फ्रीवेकडे जाणारी वाहने अमरमहल, नेहरूनगर ब्रीजमार्गे जातील.
सदर आदेश आजपासून पुढील आदेशापर्यंत अंमलात राहणार आहेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
रेल्वेत प्रचंड गर्दी
मराठा आंदोलक राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत येत आहेत. त्यामुळे रेल्वे ओसंडून वाहत आहेत. हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेन आंदोलकांनी भरल्या आहेत.‘एक मराठा लाख मराठा’ घोषणा दिल्या जात आहेत. भगवे टी शर्ट आणि टोपी घातलेले कार्यकर्ते घोषणा देत आहेत.महिन्याभराचा किराणा घेऊन मराठा आंदोलक मुंबईत
मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर मुंबईत दाखल झालेले मराठा आंदोलक सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. एक महिन्याभराचा किराणा साहित्य घेऊन ते मुंबईला धडकलेत. ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याची भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे. आझाद मैदानात मुलभूत सुविधा न पुरवल्यावरूनही त्यांनी बीएमसीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

