आमदार असताना जन्मठेपेची शिक्षा
मुंबई- शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने कुख्यात अरुण गवळीला जामीन मंजूर केला आहे. यामुळे गवळीचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा केला जात आहे.कमलाकर जामसंडेकर यांची 18 वर्षांपूर्वी 2 मार्च 2007 रोजी हत्या करण्यात आली होती. जामसंडेकर त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक होते. ते आपल्या घाटकोपर येथील घरात टीव्ही पाहत असताना अरुण गवळी गँगचे गुंड त्यांच्या घरात शिरले आणि त्यांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली. कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणामुळे मुंबईत तेव्हा मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर अरुण गवळीला अटक केली होती. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने गवळीसह इतर 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर सुरेश पांचाळ, दिनेश नारकर व गणेश साळवी या सहआरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली. विशेष म्हणजे ही घटना घडली त्यावेळी अरुण गवळी आमदार होता. त्यामुळे एका आमदाराला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची ती पहिलीच वेळ होती.तेव्हापासून अरुण गवळी तुरुंगात बंदिस्त आहे. या प्रकरणी जामीन मिळवण्यासाठी त्याने अनेकदा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. पण कोर्टाने ती फेटाळली. अखेर आज न्यायमूर्ती एम एम सुंदरेश व न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने त्याच्या वाढत्या वयाचा विचार करत त्याला जामीन मंजूर केला. गवळी सध्या 76 वर्षांचा आहे.
2 मार्च 2007 रोजी सायंकाळी कमलाकर जामसंडेकर आपले नियमित काम संपवून घरी परतले होते. ते घाटकोपरच्या असल्फा व्हीलेज येथील रुमानी मंझील चाळीत राहत होते. ते आपल्या घरात निवांत टीव्ही पाहत असताना अरुण गवळीचे गुंड त्यांच्या घरात शिरले. त्यांनी जामसंडेकर दिसताच त्यांच्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, सदाशिव सुर्वे व साहेबराव भिंताडे यांनी जामसंडेकर यांच्या हत्येची गवळीला 30 लाख रुपयांची सुपारी दिली होती. या प्रकरणात सुर्वे व भिंताडे यांनाही अटक झाली होती. त्यानंतर 21 मे 2008 रोजी अरुण गवळीच्याही भायखळा येथील दगडी चाळीतून मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. 27 जुलै 2008 रोजी मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या कमलाकर जामसंडेकर यांनी अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेना पक्षाचे उमेदवार अजित राणे याचा अवघ्या 367 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर नगरसेवक म्हणून काम करत असतानाच त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

