पुणे, दि. २८: : पर्यटन संचालनालय, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव कालावधीत देशी-विदेशी पर्यटकांकरिता पुण्यातील नामांकित गणेश मंडळाच्या दर्शनाकरिता गणेश दर्शन सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे; अधिकाधिक पर्यटकांनी या सहलीचा सहभाग लाभ घेण्याकरिता नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या उपक्रमाअंतर्गंत वय 60 वर्षे व त्याहून अधिक वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना गणेश दर्शन सहल आयोजित करण्यात येत आहे. 1 सप्टेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींसाठी त्रिशुंडया गणपती, कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग, दगडूशेठ हलवाई, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, बाबू गेनू गणपती व अखिल मंडई मंडळ या गणपतींच्या थेट दर्शनाची सुविधा करण्यात येणार आहे. इच्छुकांकरिता दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 ते दु. 1.30 वाजेपर्यंत कात्रज डेपो, हडपसर (गाडीतळ), कोथरुड डेपो, शिवाजीनगर (मॉडेल कॉलनी) व येरवडा (गुंजन टॉकीज) या आगारामधून पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. यांच्या 5 वातानुकूलीत बसेस (प्रती बस 35 प्रवासींकरीता) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
ज्येष्ठ नागरिकांसाठी पर्यटन विभागाव्दारे मार्गदर्शक, अल्पोपहार, पाणी व आरोग्य सेवक (प्रथमोपचार संचासह) आदींची सोय करण्यात आली आहे. नाव नोंदणीकरणेरिता गणेश बेंद्रे (संपर्क क्रमांक 9730993282) करावा तसेच गुगल फार्म- https://forms.gle/BbE36QZDyasCGH2SA व क्युआर कोड वर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय पर्यटन कार्यालयाच्या उपसंचालक शमा पवार यांनी केले आहे.

