पुणे : एका भाजपा आमदाराच्या अगदी जवळच्या कार्यकर्त्याने केलेल्या अश्लील स्पर्शामुळे त्याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिलेल्या महिला पोलीस इन्स्पेक्टरला वरिष्ठांकडून जाचक विनंत्या होऊ लागल्याने त्या रजेवर गेल्या आणि रजेवरून परत आल्यावर मागील तारखेचे पत्र बनवून त्या आधारे या महिला अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. या अन्यायाविरोधात त्यांनी प्रशासकीय न्यायाधिकरणाचे दरवाजे ठोठावल्यावर प्रशासकीय न्यायाधिकरणाने पोलिसांची कानउघाडणी करणरे आदेश दिले आहेत आणि या महिला इन्स्पेक्टर ची बदली करणारे वरिष्ठांचे आदेश रद्द केले आहेत. सुसंस्कृत पुण्याला आणि पुण्याच्या पोलीस दलाला या आदेशाने ‘आरसा ‘ दाखविण्याचे काम केले आहे.यामुळे एकीकडे पुरावे असल्याने संबधित कार्यकर्त्याला अटक केल्याचे म्हटलेल्या पोलिसांनी नंतर लगेचच या महिला पोलीस अधिकाऱ्यावरही बदलीची कारवाई करून दोन्ही बाजूंनी समजूत काढण्याचे जणू प्रयत्न केले होते असे निष्पन्न झाले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर करण्यात आलेला बदली आदेश प्रशासकीय न्यायाधिकरणाने रद्द केला आहे. हा बदलीचा आदेश ‘दंडात्मक’ स्वरूपाचा आणि ‘सूडबुद्धी’ने काढल्याचे दिसून येते,असे निरीक्षण न्यायाधिकरणाने स्पष्ट केले आहे,या निर्णयामुळे संबंधित महिला अधिकाऱ्यास मोठा दिलासा मिळाला आहे.
संबंधित महिला वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची जुलै २०२४ मध्ये बदली होऊन पुणे शहरात नेमणूक झाली होती. जून २०२५ मध्ये त्या बंदोबस्त ड्युटीवर असताना शिवाजी रस्त्यावर त्यांचा विनयभंग झाला. त्यांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती देऊन फरासखाना पोलिस ठाण्यात आरोपी प्रमोद कोंढरे विरुद्ध गुन्हा नोंदवला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित अधिकारी महिलेला अन्य ठिकाणी बदली स्वीकारण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यावर अधिकारी महिलेने ठामपणे नकार देत सांगितले, ‘मी गुन्हा दाखल केला आहे; आता बदली झाली, तर समाजात चुकीचा संदेश जाईल,’ असे सांगून त्यानंतर त्या रजेवर गेल्या.रजेवरून परत आल्यानंतर २१ जुलैला त्यांना वाहतूक शाखेत बदली झाल्याचा आदेश मिळाला. हा आदेश पोलिस स्थापना मंडळाच्या निर्णयानुसार घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात आदेश ‘मनमानी, दंडात्मक आणि महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा’ असल्याचे त्यांनी न्यायाधिकरणात मांडले.
ठळक मुद्दे…
गुन्हा दाखल केल्यानंतर,दोन दिवसांत काढला आदेश,अन्याय्य बदली आदेश,आदेश दंडात्मक व सूडबुद्धीने घेतल्याचे वाटते आदेश रद्द;
महिला पोलिस निरीक्षकाच्या बदलीचा आदेश आधीच्या तारखेचा आहे. ‘कारणे दाखवा नोटीस’ न देता आदेश प्रसिद्ध केला गेला. निरीक्षकाच्या विरोधात अहवाल शनिवारी तयार करून दोन दिवसांतच आदेश काढला गेला. त्यांच्या शिस्तीवर कधीही कारवाई झालेली नव्हती, उलट त्यांना प्रशस्तिपत्रके व पुरस्कार मिळाले आहेत, असे त्यांनी न्यायाधिकरणात मांडले.
माझी राजकीय कारकीर्द संपविण्याचा डाव :दरम्यान यातील आरोपी कोंढरे यांनी माय मराठी ला फोन करून सांगितले कि, आता प्रकरण न्यायालयात आहे आणि न्यालायावर माझा विश्वास आहे , मी यात पूर्ण निर्दोष आहे , कोणीतरी माझा राजकीय गेम केला आहे. आणि सर्वच पोलीस अधिकाऱ्यांच्या बद्दल मला आदर देखील आहे. मी कोणाची बदली करा म्हणून सांगितले नाही, प्रशासनाने त्यांची बदली केली आणि त्यांनी दाद मागितली या प्रकरणात पुन्हा माझे नाव त्याच प्रकरणाला उजाळा देत आणले गेले व पुन्हा बदनामीला मला सामोरे जावे लागते हा माझ्यावर अन्याय आहे माझी निव्वळ राजकीय कारकीर्द नाही तर वैयक्तिक आयुष्यावरही यामुळे परिणाम होत आहे.

