श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; गणेशोत्सवाचे १३३ वे वर्ष
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षी गणेशोत्सवात केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. श्री गणेश चतुर्थीला मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झाले.
यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर. हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान मानले जाणारे १०८ दिव्य देसमांपैकी म्हणजेच निवास स्थानांपैकी एक आहे. अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात साकारण्यात आली आहे. तसेच विद्युत रोषणाईने ती उजळून निघाली आहे.
पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत ५ थरांचा गोपुर आहे. त्यामध्ये कृष्णलीला, रामायण, सप्तऋषी, घोडे, हत्ती, सिंह साकारण्यात आले आहेत. तर, गाभा-यात विष्णू लक्ष्मी, शिवपार्वती, श्रीकृष्ण आणि नृसिंह यांच्या मूर्ती आहेत. मुख्य मखराच्या वरच्या बाजूस अष्टकोनी भागामध्ये भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती साकारण्यात आली आहे. नानाविध वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेल्या मंदिराची प्रतिकृती सुमारे १०० फूट इतकी आहे.
प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच आहे. यामध्ये ३० भव्य खांब असून ५०० देवी-दैवता, ऋषीमुनी यांच्या मूर्ती आहेत. गाभारा सुवर्ण रंगाने सजलेला असून संपूर्ण छताचा भाग अष्टकोनी स्वरूपात साकारण्यात आला आहे. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रीं चे दर्शन घेता येईल.

