मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे भव्य मोर्चाची सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोर्चा पुढे ढकलावा म्हणून मंगळवारी आपले OSD (विशेष कार्यकारी अधिकारी) मनोज जरांगे यांच्याकडे पाठवले होते.
या माध्यमातून मुंबईत सण काळात आंदोलन होऊ नये, यासाठी समजूत घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मनोज जरांगे यांनी मोर्चा 27 ऑगस्ट रोजीच निघणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला होता. दरम्यान, मुंबई पोलिसांनी जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. तत्पूर्वी हायकोर्टाने ही परवानगी नाकारल्याने मोठा वाद झाला होता.
…मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांना काल दिनांक 26 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईत आंदोलनासाठी परवानगी नाकारली होती. परंतु, तरीदेखील मनोज जरांगे यांनी आज सकाळपासूनच मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. त्यातच आता मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी एका दिवसासाठी देण्यात आली आहे. यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही सर्व नियमांचे पालन करत आंदोलन करणार आहोत. परंतु, हे आंदोलन एक दिवसाचे नाही, तर बेमुदत असणार आहे. 29 ऑगस्ट रोजी मी उपोषणाला बसणार असल्याचे मनोज जरांगे यांनी ठामपणे सांगितले.
मनोज जरांगे काय म्हणाले?
आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिली असेल, तर कायद्याचे सर्व नियम आम्ही नक्की पाळू. माझा समाज देखील सर्व नियम पाळणार. कायद्याच्या नियमाबाहेर बाहेर जाणार नाही. ती ऑर्डर काय आहे ते मला माहीत नाही. पण मी २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता उपोषणाला बसणार आहे. आम्ही हट्टी नाहीत, त्यांनी जे सांगितले त्या निर्णयांचे मराठ्यांकडून तंतोतंत पालन होणार. पण एक दिवसाचे नाही, तर बेमुदत. मी आता त्यावर प्रतिक्रिया देत नाही. संध्याकाळी शिवनेरी गडावर गेल्यानंतर पूर्ण ऑर्डर बघतो. त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देतो, असे मनोज जरांगे म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारचे आणि न्यायालयाचे मनापासून आभार देखील मानले.
…तर मागण्याही एका दिवसांत पूर्ण करा
एका दिवसात उपोषण कसे करायचे? अशी विचारणा मनोज जरांगे यांनी केली. एका दिवसाची परवानगी दिली, तर आमच्या एका मागण्या एका दिवसांत मंजूर करा. तुम्ही जोपर्यंत मागण्या मंजूर करत नाहीत, तोपर्यंत मी उपोषणाला बसणार, असेही मनोज जरांगे म्हणाले. आमच्या मागण्या आत्ता मान्य करा, लगेच गुलालाच्या ट्रक भरतो. तीन लाख ट्रक आणण्याचा शब्द दिलेला आहे. नाही आणल्या तर नाव बदलून ठेवीन. तीन लाख ट्रक गुलालाने मुख्यमंत्र्यांचा बंगला बुजवून टाकतो, असेही जरांगे म्हणाले.
आंदोलनासाठी पोलिसांनी घातलेल्या मुख्य अटी आणि शर्ती
आमरण उपोषण अंतरवाली सराटी, ता. अंबड, जि. जालना.
ज्याअर्थी, आपण दि.२९/०८/२०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता आझाद मैदान मुंबई येथे मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांची राज्य सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी म्हणून आपण आंदोलन/ आमरण उपोषण करणार आहात, त्याचे परवानगीसाठी दि. २६/०८/२०२५ रोजीचे पत्राद्वारे विनंती केली आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क वर्ष ११, अंक ३०) मंगळवार, ऑगस्ट २६, २०२५ भाद्रपद ४, शके १९४७, असाधारण क्रमांक ४५, प्रधिकृत प्रकाशन अन्वये जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका (अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग मुंबई यांच्या अधिकार क्षेत्रात) नियम २०२५ नुसार आंदोलकांना सार्वजनिक सभा, संमेलने, मोर्चे, आंदोलने, निदर्शने, धरणे, मेळावे, मिरवणुका इत्यादीसाठी आझाद मैदान (राखीव भाग), निश्चित करण्यात आला आहे. नमुद नियमावली मध्ये आझाद मैदान या ठिकाणाची निश्चिती रहिवाशांना, रहदारीला, कमीत कमी अडथळा होण्याचे आणि विनियमित केलेल्या रीतीने निदर्शकांसाठी पुरेशी जागा उपलब्ध होण्याचे तत्व विचारात घेवून करण्यात आले आहे.
नमुद नियमावलीतीत खालील महत्वाचे नियम आहेत.
नियम क्र. ४ (६) (च) नमुद आंदोलनास एका वेळी फक्त एका दिवसासाठी परवानगी देण्यात येईल. शनिवार, रविवार व शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोणत्याही परवानग्या देण्यात येणार नाहीत.
नियम क. ५ नुसार ठराविक वाहनांना परवानगी देण्यात आलेली असून वाहनतळासाठी वाहतूक पोलीसांशी विचारविनिमय करुन परवानगी देण्यात येईल. तसेच आपली वाहने मुंबईत प्रवेश केल्यानंतर ईस्टर्न फ्री वे या रस्त्याने वाडीबंदर जंक्शन पर्यंत येतील. त्यापुढे मुख्य आंदोलकासोबत फक्त ५ वाहने आझाद मैदान येथे जातील व इतर सर्व वाहने ही वाडीबंदर येथून पोलीसांनी निर्देशित केलेल्या शिवडी, ए शेड व कॉटनग्रीन परिसरात थेट नियोजित ठिकाणी पार्कंग करीता नेण्यात यावीत.
नियम क्र. ६ मध्ये आंदोलकांची कमाल संख्या पाच हजार ही पाळणे बंधनकारक आहे. तसेच आझाद मैदानाचे ७००० स्कवेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेले असून त्याची क्षमता ५००० पर्यंत आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे, परंतु तेथे प्रचंड मोठया संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानात पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही. तसेच आपले अर्जापूर्वी इतर आंदोलकांनी सुध्दा दिनांक २९/८/२०२५ रोजी आंदोलनासाठी परवानगी मागितलेली आहे, त्यांचा आंदोलनाचा हक्क सुध्दा बाधित करता येणार नाही, त्यामुळे ५००० आंदोलकांमध्ये त्यांचा सुध्दा समावेश असेल, त्यामुळे त्या आंदोलकांना मैदानातील पुरेशी जागा उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे.
नियम क. ७ मध्ये नमूद असल्याप्रमाणे विनिर्देशित केलेल्या क्षेत्राच्या दिशेने आणि क्षेत्राकडून मोर्चा नेला जाणार नाही.
नियम क. ८ मध्ये नमूद असल्याप्रमाणे परवानगी घेतल्याशिवाय ध्वनीक्षेपक, सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणारी उपकरणे यांचा वापर करता येणार नाही.
नियम क. १० मधील आंदोलनाची वेळ सकाळी ९.००. ते सायंकाळी ६.०० याच वेळेसाठी दिलेली असून त्यानंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही.
नियम क. ११ (ज) नुसार सहभागी व्यक्ती ही विनिर्देशित क्षेत्रात कोणतेही अन्न शिजवणार नाहीत किंवा केर कचरा टाकणार नाहीत असे महत्त्वाचे नियम असून इतर सुध्दा नियम नमुद केलेले आहेत.
नियम क. ४ (ग) मध्ये आम्हांस असलेल्या अधिकारान्वये आपणांस सूचित करण्यात येत आहे की, आपले आंदोलनाचे कालावधी दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव हा सण मोठया प्रमाणात साजरा होत आहे, त्यानुसार श्री. गणेश विर्सजन दरम्यान रहदारीस कोणताही अडथळा किंवा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा धार्मिक भावना दुखावणार नाहीत याप्रकारचे आपणाकडून किंवा आपले आंदोलकाकडून असे कृत्य होणार नाही. तसेच आपले आंदोलन कार्यक्रमात लहान मुले, गरोदर स्त्रिया व वृध्द व्यक्तींना सहभागी केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे जनहित याचिका (L) क्र. २५६५६/२०२५ यामधील दि. २६/०८/२०२५ रोजीच्या अंतरिम आदेशामध्ये परिच्छेद क्रमांक ७ (iv) मध्ये स्पष्ट निर्देश आहेत की, प्रतिवादी क्रमांक ५, ६ व ७ आणित्यांचे सहकारी यांनी परवानगी प्राप्त आंदोलनाचे अनुषंगाने संबधित प्राधिकृत अधिकारी यांनी आंदोलनासाठी घालून दिलेल्या अटी व शर्ती हे पाळणे बंधनकारक आहे.
तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने अमित साहनी केसमध्ये लोकशाही आंदोलनामुळे सामान्य जनजीवन व वाहतूक बाधित होणार नाहीत याबाबत दिलेल्या निर्देशांचा, मा. उच्च न्यायालयाने आपल्या आदेशामध्ये पुनरोच्चार केलेला आहे.
आपणास दिनांक २६/८/२०२५ रोजीचे पत्राद्वारे मा. उच्च न्यायालयाचे अंतरिम आदेश व नियमावली प्रत देण्यात आलेली आहे. सदर नियमावलीचे अधीन राहून आपणांस शांततामयरित्या आंदोलन करण्यास सशर्त परवानगी देण्यात येत आहे.
परंतू आझाद मैदानामध्ये सुरु असलेले आंदोलना दरम्यान आंदोलकांनी उपरोक्त अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यास अथवा इतर प्रचलित कायदयाचा भंग केल्यास सदरचे आंदोलन हे बेकायदेशीर घोषित करुन उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सदर परवानगी दिनांक २७/०८/२०२५ रोजी माझ्या सही शिक्यानिशी देण्यात येत आहे

