मुंबई-अवघ्या राज्यात गणेशोत्सवाचा आनंद असताना मुंबईतील विरार परिसरात एक 4 मजली इमारत कोसळून वाढदिवस असणाऱ्या एका चिमुकलीसह तिच्या आईचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत 3 जणांचा बळी गेला आहे. गंभीर म्हणजे ढिगाऱ्याखाली चिमुकलीच्या वडिलांसह अजून 20 ते 25 जण अडकल्याची शक्यता आहे. त्यामुळे मृत्युचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, विरारच्या नारंगी फाटा परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या 4 मजली इमारतीचा मंगळवारी रात्री उशिरा एक भाग कोसळला. या दुर्घटनेत 3 जण ठार झाले असून, 20 ते 25 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. ही घटना घडली तेव्हा इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या जोयल कुटुंबातील एका 1 वर्षीय चिमुकलीचा वाढदिवस साजरा केला जात होता. घरात आनंदाचे वातावरण होते. पण अचानक इमारतीचा एक भाग कोसळल्यामुळे होत्याचे नव्हते झाले. त्यात बर्थडे गर्लसह तिची आई व अन्य एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सध्या इथे अग्निशमन दल, पोलिस, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक (एनडीआरएफ) व स्थानिक प्रशासनातर्फे मदतकार्य सुरू आहे. त्यात आतापर्यंत 5 जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांच्यावर लगतच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिकांच्या माहितीनुसार, ही इमारत फार जुनी होती. तिच्या भिंतीना तडे गेले होते. सलग होणाऱ्या पावसामुळे या भेगा अधिकच रुंद झाल्या होत्या. वारंवार सूचना देऊनही दुरुस्तीचे काम करण्यात आले नव्हते. त्यामुळे ही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सध्या ढिगारा हटवून त्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेले लोक मदतीसाठी हाक देत असल्याचेही निदर्शनास येत आहे. सदर अपार्टमेंटमध्ये 12 च्या आसपास कुटुंब वास्तव्यास होती. दुर्घटना कोसळल्या नंतर इमारतीच्या दुसऱ्या विंगला तातडीने रिकामे करून तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पोलिसांनी इमारत सील केली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे महापालिकेने 10 वर्षांपूर्वीची ही इमारत अतिधोकायक घोषित केली होती. पालिकेकडून अनेकदा त्यांना या प्रकरणी नोटीस बजावली होती. पण त्यानंतरही नागरिकांनी ही इमारत रिकामी केली नव्हती. सदर इमारतीच्या भोवती मोठ्या प्रमाणात चाळी आहेत. त्यामुळे घटनास्थळी जेसीबीसारखी यंत्रणा पोहोचवण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांवर संजीवनी हॉस्पिलट, प्रकृती हॉस्पिटल बोलिंज, सिद्धिविनायक हॉस्पिटल नालासोपारा, जीवदानी हॉस्पिटल चंदनसर आदी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

