अखिल मंडई मंडळाचे गणेशोत्सवाचे १३२ वे वर्ष : कृष्णकुंज मध्ये मंडईचे बाप्पा विराजमान
पुणे: गणपती बाप्पा मोरया… आले रे आले गणपती आले आणि शारदा गणपतीचा जयघोष करत फुलांनी सजलेल्या भव्य मयूर रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक निघाली आणि निसर्गाच्या सानिध्यातील ‘कृष्णकुंज’ मध्ये मंडईचे बाप्पा विराजमान झाले.
गणेशाची प्रतिष्ठापना दुपारी १२ वाजता युनिटी एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड चेअरमन नवीनचंद्र विप्रदास मेनकर, स्नेहल नवीनचंद्र मेनकर यांच्या हस्ते झाली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, कार्याध्यक्ष अभय थोरात, खजिनदार संजय मते, अध्यक्ष मिलिंद काची, विश्वास भोर, राजेश कराळे, सुरज थोरात, विकी खन्ना यावेळी उपस्थित होते.
अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १३२ वे वर्ष आहे. अखिल मंडई मंडळ – मंडई पोलीस चौकी, बाबू गेनू चौक, रामेश्वर चौक – गोटीराम भैया चौकातून उत्सव मंडप असा मिरवणुकीचा मार्ग होता.
मिरवणुकीच्या अग्रभागी न्यू गंधर्व बॅन्ड पथक तसेच मल्हार ढोल ताशा पथक सांगवी, स्वराज्य पथक काळभोर नगर चिंचवड, समर्थ पथक यांनी वादन केले.
कृष्णकुंज’ मध्ये विराजमान झाले शारदा गजानन
गणेशोत्सवात ‘कृष्णकुंज’ ही आकर्षक सजावट मंडळातर्फे साकारण्यात येणार आली आहे. यावर्षी हलत्या झोपाळ्यावर शारदा गणपती विराजमान झाले आहेत. सजावटीतील श्री राधाकृष्णाच्या हस्तचित्रित मनमोहक कलाकृती गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण आहेत. राजस्थानी शैलीतील ही सजावट असून प्रवेशद्वारावर झोपाळ्यावरील राधा-कृष्ण मूर्ती आहे. महिरप आणि मोरांच्या कलाकृती, कलमकारी शैलीतील श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित मोठी चित्रे भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
अण्णा थोरात म्हणाले, झोपाळ्यावर विराजमान शारदा गजानन यंदा भाविकांसाठी आकर्षण ठरणार आहे. दर तीन वर्षांनी शारदा गजानन झोपाळ्यावर विराजमान होतात. झोपाळा राजस्थानी शैलीने फुलांनी सजवण्यात आला आहे. उत्सव काळात मोरया गोसावी यज्ञ मंडपात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन, प्रवचन, भजन, आणि सामूहिक आरती यांसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

