पुणे दि. 26 :- राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य योजनेंतर्गत जिल्ह्यात गोदाम बांधकाम घटकासाठी अनुदान देण्यात येणार असून जिल्ह्याकरीता 250 मे. टन गोदाम बांधकामासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य अंतर्गत 1 गोदाम व 1 तेलबिया प्रक्रिया युनिटचे उद्दीष्ट प्राप्त आहे. याकरीता शेतकरी उत्पादक संघ व शेतकरी उत्पादक कंपनी यांचेकडून गोदाम बांधकाम उभारणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रत्यक्ष झालेल्या गोदाम बांधकामाच्या 50 टक्के किंवा 12 लाख 50 हजार रूपये जे कमी असेल अशी अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. काढणी पश्चात पायाभूत सुविधांतर्गत तेलबिया प्रक्रिया युनिट (10 टन क्षमता) आणि तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामग्री आणि उपकरणे या घटकासाठी प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के कमाल 9 लाख 90 हजार रूपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय आहे.
काढणी पश्चात पायाभूत सुविधा अंतर्गत तेलबिया प्रक्रीया युनिट निवडलेल्या लाभार्थ्याने स्वखर्चाने प्रकल्प तयार केला असल्यास प्रकल्पाचे मुल्यांकन, मूल्यमापन व उभारणी नंतर मुल्यांकन करून किंवा निवडलेल्या लाभार्थ्याने राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेतले असल्यास कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार याबाबीच्या लाभास पात्र राहील.
इच्छुक शेतकरी संघ व कंपनी यांनी या योजनेत सहभागी होण्याकरीता 30 ऑगस्ट 2025 पर्यंत संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयास आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे संजय काचोळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000
गोदाम बांधकाम उभारणी व तेलबिया प्रक्रियायूनिट घटकासाठी अर्ज करावेत
Date:

