मुंबई, दि. २६ ऑगस्ट २०२५
गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्रातील, देशभरातील आणि जगभरातील सर्व गणेशभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
त्या म्हणाल्या, “गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि सुखकर्ता आहेत. बालपणापासून बाप्पाशी असंख्य आठवणी जोडलेल्या असतात. आयुष्यातील अडचणींवर मात करण्याची हिंमत, यश मिळवण्याची शक्ती आणि मानसिक शांतता हीच बाप्पाची खरी देणगी आहे. या गणेशोत्सवात बाप्पाने सर्वांना निरोगी आरोग्य, आनंद, समृद्धी आणि शांत मनाचा आशीर्वाद द्यावा, हीच प्रार्थना आहे.”
हरितालिका पूजेचे महत्त्व
आजच्या हरितालिका पूजेविषयी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “या दिवशी महिला शंकर-पार्वतीची आठवण ठेवून उपवास आणि तपश्चर्या करतात. हे व्रत केवळ वैयक्तिक नसून कुटुंब, समाज आणि संपूर्ण जीवनाच्या प्रगतीसाठी असते. महिलांनी जशी या व्रताची जाण ठेवली आहे, तशीच पुरुषांनीही त्याचे महत्त्व ओळखले पाहिजे. मात्र उपवास करताना महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.”
गौरी आगमनाचे स्वागत
गौरी आगमनाविषयी त्या म्हणाल्या, “गौरीमातेचे आगमन हे समृद्धी, ऐक्य आणि मंगल वातावरण निर्माण करणारे असते. या निमित्ताने प्रत्येक घरात भक्ती, प्रेम आणि आपुलकीने सण साजरा होतो. भगिनीभाव आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ होतो.”
सामाजिक एकतेचा संदेश
शेवटी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “गणेशोत्सव हा फक्त धार्मिक कार्यक्रम नसून सामाजिक एकोपा, कौटुंबिक बंध, महिलांची तपश्चर्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी प्रेरणा देणारा एक महान उत्सव आहे.”

