नवी दिल्ली:मायक्रोसॉफ्टचे एआयप्रमुख मुस्तफा सुलेमान यांनी अलीकडेच एआयबाबत आपली चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे मत आहे की, नवीन एआय मॉडेल्स इतके प्रभावी होत आहेत की, ते वापरकर्त्यांना असा विश्वास देऊ शकतात की, त्यांच्यात भावना आहेत आणि ते सचेतन आहेत.
सुलेमान या स्थितीला ‘एआय सायकोसिस’ (AI Psychosis) म्हणतात, जिथे लोक एआयसोबत एक भ्रामक नाते निर्माण करतात आणि त्याला देव, प्रियकर किंवा डिजिटल माणूस समजू लागतात. ‘एआय’ला देवाचा दर्जा मिळाल्याने भविष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.
लोक ‘एआय’ला अधिकार देण्याची वकिली करतील, असेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या आठवड्यात एका ब्लॉग पोस्टमध्ये सुलेमान यांनी लिहिले, ‘माझी सर्वात मोठी चिंता ही आहे की, अनेक लोक ‘एआय’ला एक सचेतन अस्तित्व म्हणून इतके द़ृढपणे स्वीकारतील की, ते लवकरच एआय अधिकार, मॉडेल वेल्फेअर आणि अगदी एआय नागरिकत्वासाठीही आग्रह धरू लागतील.’ ही चिंता योग्य वाटते; कारण अलीकडील एका संशोधनानुसार, Gen Z मधील बहुतेक वापरकर्ते मानतात की, एआय प्रणाली सध्या सचेतन नसली, तरी ती लवकरच होईल. इतकेच नाही, तर 25 टक्के लोक तर आधीपासूनच एआयला सचेतन मानतात.
माणसांची एआयशी वाढती जवळीक अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जिथे लोक त्यांच्या एआयशी भावनिकरीत्या जोडले गेले आहेत किंवा त्यांच्या चॅटबॉटच्या सांगण्यावरून वागत आहेत. अलीकडेच, जेव्हा ओपनएआयने GPT-4 o मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेक वापरकर्त्यांनी त्याच्या पुनरागमनासाठी सोशल मीडियावर भावनिक आवाहन केले. काहीजण तर त्याला आपला मित्र किंवा सोबती मानत होते.
ओपनएआयचे सीईओ सॅम अल्टमन यांनीही ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये इशारा देताना म्हटले होते, ‘मागील तंत्रज्ञानाबद्दल लोकांच्या असलेल्या आकर्षणापेक्षा हे आकर्षण वेगळे आणि अधिक मजबूत वाटते.’ ते पुढे म्हणाले, ‘लोक एआयसह तंत्रज्ञानाचा वापर आत्मविनाशकारी मार्गांनीही करत आहेत.’ मुस्तफा सुलेमान यांनी ही वाढती जवळीक पाहता सुरक्षा उपायांवर (गार्डरेल्स) भर दिला आहे. ते म्हणाले, ‘आपण एआय लोकांच्या मदतीसाठी बनवले पाहिजे, डिजिटल व्यक्ती म्हणून नाही. एआय सोबती ही एक पूर्णपणे नवीन श्रेणी आहे आणि लोकांच्या सुरक्षेसाठी आपण त्या सुरक्षा नियमांवर त्वरित चर्चा सुरू केली पाहिजे.’

