जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे आयोजन ; ज्येष्ठ समाजसेविका पुष्पा नडे, माजी महापौर कमल व्यवहारे यांची उपस्थिती
पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् च्यावतीने सातवा आदर्श माता पुरस्कार विमला भंडारी, कुशावर्ता गीते, प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे यांना प्रदान करण्यात येणार आहे. रविवार, दिनांक ३१ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता न-हे येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुरस्कार वितरण सोहळ्याला ज्येष्ठ समाजसेविका पुष्पा नडे, माजी महापौर कमल व्यवहारे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. साडी, श्रीफळ, पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराचे यंदा सातवे वर्ष असून संस्थेच्या खजिनदार सुरेखा सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, जितो एपेक्स इंटरनॅशनलचे विजय भंडारी यांच्या विमला भंडारी या मातोश्री आहेत. तर, तौरल इंडियाचे संस्थापक भरत गीते यांच्या मातोश्री कुशावर्ता गीते या दुस-या पुरस्कारार्थी आहेत. तसेच तिस-या पुरस्कारार्थी प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे यांच्या मातोश्री आहेत. विविध क्षेत्रातील या दिग्गज व्यक्तिमत्वांना घडवून समाजसेवेचे धडे दिल्याबद्दल कृतज्ञता म्हणून या मातांना गौरविण्यात येणार आहे.
लहानपणापासून केलेले संस्कार, योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन यामुळे प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठू शकतो. मात्र, त्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे त्यांच्या आईचे अमूल्य योगदान असते. त्यामुळे समाजातील अशाच यशस्वी व्यक्तींच्या मातांचा सन्मान संस्थेतर्फे केला जाणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

