शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट ; मंडळाचे १३० वे वर्ष
पुणे : युनेस्को ने छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित केले आहे. त्यानिमित्त शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्यावतीने यंदाच्या गणेशोत्सवात या किल्ल्यांची प्रतिकृती आणि त्यांचा इतिहास सांगणारी ध्वनी चित्रफीत असा देखावा सादर करण्यात येणार आहे. तसेच यानिमित्ताने दि ३० आॅगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत प्रसिद्ध इतिहास अभ्यासकांच्या व्याख्यानमालेचेही आयोजन दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला मंडळाचे उपाध्यक्ष अनंत कावणकर, सचिव पराग ठाकूर, कार्याध्यक्ष कौस्तुभ गोखले, गिरीश सरदेशपांडे, महेश काटदरे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ १८९६ साली स्थापन झाले असून मंडळाचे यंदा १३० वे वर्ष आहे. गेली अनेक वर्षे मंडळ राष्ट्रीय, सामजिक, वैज्ञानिक, ऐतिहासिक अशा विविध विषयांवर देखावे सादर करीत आहे. यंदा देखील ही परंपरा कायम राखत शिवनेरी, राजगड, लोहगड, प्रतापगड, पन्हाळा, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खान्देरी, सुवर्णदुर्ग, जिंजी, रायगड या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्यात येत आहेत.
शालेय विद्यार्थ्यांना देखील शिवरायांचा हा इतिहास समजावा आणि परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी देखावा बघण्यासाठी यावे, यासाठी शाळांशी देखील संपर्क साधण्यात येणार आहे. नारळकर इन्स्टिट्यूट व्होकेशनल विभाग, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, शिव सृष्टी आंबेगाव यांनी देखील यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.
गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच मंडळ वर्षभर शिवजयंती, दहीहंडी, नवरात्र उत्सव असे कार्यक्रम साजरे करते. मंडळाचा एक महत्वाचा उपक्रम म्हणजे आपुलकीची दिवाळी. मंडळाने २० वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरु केला असून ससून रुग्णालय परिसरातील सोफोश या अनाथाश्रमातील मुलांबरोबर वसुबारस या दिवाळीच्या पहिल्या दिवशी मंडळाचे कार्यकर्ते दिवाळी साजरी करतात.
गेल्या काही वर्षांपासून शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळे, विमा, विविध कंपन्या यांच्या कर्मचारी संघटना या उपक्रमात सहभागी होत आहेत. उपक्रमात सातत्य ठेवल्याने आता प्रत्यक्ष आर्थिक साहाय्य आणि वस्तुरुपाने मदत याचे मूल्य १० लाखांपर्यंत गेले आहे. या व्यतिरिक्त सैनिक मित्र परिवार, विधायक पुणे या संस्थानी आयोजित केलेल्या उपक्रमात मंडळाचा सक्रिय सहभाग असतो. तरी गणेशभक्तांनी यंदाचा नाविन्यपूर्ण देखावा पाहण्यासाठी अवश्य यावे. तसेच मंडळाच्या सर्व सामाजिक उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

