मुंबई-महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढली आणि याचा चांगलाच फायदा निवडणुकीत झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु, आता या योजनेचा लाभ काही अपात्र लोकांनी देखील घेतला असल्याचे समोर आले आहे. तब्बल 26 लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र नसल्याचे समोर आले आहे. याबाबत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
अदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करुन दिली होती. सदर सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत.
छाननीअंती या लाभार्थींची पात्रता/अपात्रता स्पष्ट होणार
त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थींची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सुक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरु आहे. छाननीअंती या लाभार्थींची पात्रता/अपात्रता स्पष्ट होणार आहे.
छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल, तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पुवर्वत सुरु राहील, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.
मोठ्या प्रमाणावर सरकारची फसवणूक,पण कायदेशीर कारवाई किंवा निधी परत घेण्याचा सरकारचा विचार नाही –दरम्यान, यावर राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र आढळलेल्या महिला लाभार्थींना फक्त योजनेतून बाहेर काढले जाईल. त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई किंवा निधी परत घेण्याचा सरकारचा विचार नसल्याचे म्हटले आहे.राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. सरकारने राबवलेल्या शोधमोहिमेमध्ये तब्बल 26 लाख 34 हजार बोगस लाभार्थी आढळले आहेत. हे सर्व लाभार्थी प्रत्यक्षात पात्र नसतानाही दरमहा 1500 रुपयांचा निधी घेत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सरकारची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

