पुणे : धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानचा कै.धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार यंदा पारधी समाजासाठी भरीव कार्य करणारे नामदेव भोसले, तसेच संगीतकार सलील कुलकर्णी आणि सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक पटेल यांना जाहीर झाले आहेत.प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी आमदार, मोहन जोशी यांनी काँग्रेस नेते, माजी नगरसेवक कै.धनंजय थोरात यांच्या १८व्या स्मृतीदिनानिमित्त पुरस्कारांची घोषणा आज केली.
मुख्य पुरस्कार नामदेव भोसले यांना जाहीर झाला असून २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सलील कुलकर्णी आणि मुश्ताक पटेल यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे आहे.
नामदेव भोसले
नामदेव शेवराबाई ज्ञानदेव भोसले. कानगाव तालुका – दौंड, जिल्हा -पुणे. जन्मतारीख २२ फेब्रुवारी १९७७. नदीकाठी काटेरी जंगलात पालामध्ये जन्म झाला. घरातील अठरा विश्व दारिद्र्यातून स्वतःला सावरत अथक परिश्रमातून प्रचंड सामाजिक कार्य त्यांनी केले.
नामदेव भोसले हे पारधी समाजाच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत आहेत. जवळपास १लाख७०० आदिवासी आणि पारधी लोकांना गुन्हेगारीच्या कलंकित जीवनातून बाहेर काढून त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी नामदेव भोसले यांनी घरकुले उभी करून दिली आणि शासकीय कागदपत्रे मिळवून दिली. आदिवासी आणि पारधी समाजाला लागलेला चोर, दरोडेखोर हा कलंक पुसण्यासाठी पोलीस आणि पारधी यांच्यात सामंजस्य घडवून आणण्याचा आटोकाट प्रयत्न भोसले करीत आहेत. एकल महिलांना शासकीय सुविधांचा लाभ मिळवून देणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणे असे काम करत असून, त्यांनी महिला समितीही स्थापन केली आहे. आदिवासी, भटक्या समाजातील मृत्यू झालेल्या ३हजार४६० गरीब, बेवारस लोकांसाठी जागा मिळवून दिली. त्यासाठी संघर्ष केला. घर सोडून गेलेल्या ५४५ आदिवासी मुलींनी माघारी बोलावले त्यांचे विवाह करून दिली. अनेकांना अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढून त्यांना वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छतेची जाणीव करून दिली. आदिवासी पाड्यांवर विविध प्रकारच्या ५लाख झाडांचे वृक्षारोपण केलं, करोना साथीच्या काळात मित्र परिवाराकडून मदत घेऊन ११हजार गरीब कुटुंबांना धान्य पुरवून त्यांची भूक भागविली.
सलील कुलकर्णी
नावाजलेले गायक, संगीतकार आणि लेखक. नवीन पिढीचे संगीतकार अशी त्यांची ओळख आहे. हिंदी, मराठी भाषेतील अनेक गीतांना त्यांनी संगीत दिलेले आहे. कवी संदीप खरे यांच्याबरोबर केलेला ‘आयुष्यावर बोलू काही’ या सांगितिक कार्यक्रमाचे हजारहून अधिक प्रयोग त्यांनी केले. टीव्ही मालिकांतील संगीत स्पर्धेत परीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. अनेक नवोदित गायकांना मार्गदर्शन करून त्यांनी घडवले आहे. पुस्तक लेखन, वृत्तपत्रीय लेखन करून त्यांनी समृद्ध कामगिरी केली आहे.
मुश्ताक पटेल
मुश्ताक पटेल पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते असून गेली ३० वर्षांहून अधिक काळ जाती धर्मात सलोखा रहावा, यासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. आषाढी वारी पुणे मुक्कामी असताना वारकऱ्यांसाठी स्वतःच्या जागेत निवारा उपलब्ध करून देणे, सुकामेवा मिश्रीत शीरकुर्माचा प्रसाद देणे अशी सेवा ते करत आहेत.

